संप कधी मिटणार, एसटी कधी येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 05:00 AM2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:45+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खासगी वाहनांचा वेळेचा कसलाही भरोसा नसल्याने शाळेतून घरी जायला वेळ होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी दळणवळणाचे साधन असलेल्या एसटीला सध्या ग्रहण लागले आहे. एसटीचा संप मिटून लालपरी ग्रामीण भागात कधी सुरू होणार याची, चर्चा ऐकावयास मिळत आहे.
गत तीन महिने एसटी महामंडळातील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर ठाम आहेत. परंतु शासन पातळीवरून कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही काही तोडगा न निघाल्याने संपत सुरूच आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. जिल्ह्यातील आगारातून लांबपल्ल्याच्या एसटी बसेस बंद असल्याने अनेक बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे. यात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटीची सेवा ही महत्त्वाची आहे. अनेक शेतकरी, शाळेतील विद्यार्थ्यांना ही सेवा अत्यावश्यक आहे. कारण प्रत्येक गावात एसटीची सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक फेऱ्या तोट्यात चालत असताना लालपरी ग्रामीण भागात सेवा देत होती. त्यामुळे सर्वांनाच ही लालपरी आपली वाटते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आता सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंडळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खासगी वाहनांचा वेळेचा कसलाही भरोसा नसल्याने शाळेतून घरी जायला वेळ होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. एसटीची सेवा बंद असल्याने त्याचा थेट परिणाम अनेक गावातील शहरातील बाजारपेठांवर झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरात येण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अगदी महत्त्वाच्या कामासाठी किंवा दवाखान्यातील उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल काही प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे हा संप कधी मिटणार व आपल्या गावात कधी लालपरी येण्याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांना लागली आहे.
खासगी वाहनधारकांकडून लूट
एसटीअभावी ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी नागरिकांचे, शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटीचा संप सुरू असल्याने खासगी वाहनाने ग्रामीण भागातील लोकांना पर्याय उरला आहे. परिणामी अधिक पैसे देऊन प्रवास करावा लागत आहेत.