देवगाव चौफुलीवर कधी होणार पोलीस चौकी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:10+5:302021-06-29T04:10:10+5:30
अवैध धंद्यात वाढ पोलिसांची नाही गस्त धामणगाव रेल्वे : तीन जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या देवगाव चौफुली परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ ...
अवैध धंद्यात वाढ
पोलिसांची नाही गस्त
धामणगाव रेल्वे : तीन जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या देवगाव चौफुली परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी कधी होणार, असा प्रश्न या भागातील ग्रामस्थांकडून विचारणा होत आहे.
अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी नागपूर-औरंगाबाद रस्त्यावरील महामार्गावर देवगाव चौफुली आहे. या चौफुलीवर दररोज नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती अशा शहरांसाठी वाहतुकीची वर्दळ असते. येथून चार किलोमीटर अंतरावर तळेगाव दशासर पोलीस ठाणे येत असले तरी या देवगाव चौफुलीवर पोलिसांची गस्त कमी असल्याने अवैध धंद्यात वाढ झाली असल्याचे तक्रार येथील काही ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या भागातून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू जात असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहे.
विशेष म्हणजे, धामणगाव तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाची केंद्रबिंदू म्हणून देवगाव चौफुली ओळखली जाते. चार वर्षांपूर्वी येथे तात्पुरते पोलीस केंद्र उभारण्यात आले होते. मात्र, कायमस्वरूपी पोलीस चौकीला राज्याच्या गृहविभागाने मंजुरी दिली नाही. लोकसंख्येचा विचार केला, तर हिरपूर, उसळगव्हाण, जळका पटाचे, मलातपूर, बोरवघड ही महत्त्वपूर्ण अधिक लोकसंख्येची गावे देवगाव चौफुलीजवळ आहेत. वाढते अवैद्य धंदे व पोलिसांच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे या भागात शासनाने पोलीस चौकीला मंजुरी द्यावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.