कासवांना कधी मिळणार संरक्षण?
By Admin | Published: March 5, 2016 12:27 AM2016-03-05T00:27:13+5:302016-03-05T00:27:13+5:30
या आधुनिक युगात झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाला एका फीशपॉट मध्ये बंदिस्त करून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.
लक्ष्मीदर्शनाचा मोह : झटपट श्रीमंत होण्याची अजब धडपड
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
या आधुनिक युगात झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाला एका फीशपॉट मध्ये बंदिस्त करून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. विदर्भातील अनेक श्रीमंताच्या घरी जिवंत कासवांचा जीव घुसमटत असून वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे़
कमी वेळात अधिक समृध्दी देण्याचे काम कासव करीत असल्याची आख्यायिका आहे़ पाच हजार वर्षांपूर्वीचा कासवाचा इतिहास आहे़ प्रत्येकाच्या जीवनात सुख समृध्दी, संपत्ती कमी वेळात मिळावी म्हणून पगारदारांच्याही घरात कासव पाळले जात आहे़ अनेकांकडे फीशपॉटमध्ये दोन मासे असले तरी एक कासवाचे पिल्लू पहायला मिळते़
यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कासव हा सुखसमृध्दी मिळण्याचे प्रतीक मानले जाते़ कासवाला दीर्घायुष्य असते़ या मुक्या प्राण्याला मागील अनेक वर्षांपासून बंदिस्त करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे़ घरातील वास्तुदोष तसेच शत्रूपासून स्वत:चे रक्षण करणे, रोग व अनेक व्याधीपासून दूर राहण्यासाठी कासवाची मोठ्या किमतीत खरेदी करून त्याला बंदिस्त करण्याचे प्रकार आजघडीला विदर्भात मोठ्या प्रमाणात वाढील लागल्याचे दिसून येत आहे़
पन्नास हजार ते पाच
लाखापर्यंत किंमत
कोणते ही प्रयत्न न करता एका महिन्यात आपण श्रीमंत व्हावे घरात सुख समृध्दी नांदावी, आपल्या घराला कोणाचीही दृष्टी लागू नये, यासाठी आजच्या या आधुनिक युगात अंधश्रध्देचा पगडा कायम आहे़ अमरावती विभागातीलच नव्हे, तर विदर्भातील मोठ्या नदीमध्ये कासवाचे पिल्लु पकडण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे़ मागील महिन्यात एका कासवाच्या पिलाची किंमत ५० हजार रूपये लागल्याची माहिती आहे़ जो कासव अती शुभ ठरविला जातो़ त्या कासवाला विदर्भातून मुंबईसारख्या शहरात पाच लाखांच्यावर वर मागणी असल्याने अनेकजण कासव पकडण्यासाठी विहिरी व नदीत दिवसाला अधिक मेहनत करीत आहेत़
नेत्यांच्या घरात दिसतेय कासव
कासव हा वन्यजीवप्राणी असला तरी अनेक राजकीय नेत्यांच्या घरी फीशपॉटमध्ये कासव हा शोभेची वस्तू म्हणून दिसत आहे़ घरात सुख समृध्दी लाभावी, आपण आगामी निवडणुकीत सर्वाधिक मताने विजयी होण्यासाठी विदर्भातील अनेक नेत्यांनी या कासवाला बंदिस्त करून ठेवले आहे़ या नेत्यांच्या घरात शोभेची वस्तू म्हणून हा जिवंत कासव पहायला मिळत आहे़
सद्गुणांचे प्रतीक कासव
कासव हा जीव सद्गुणांचा प्रतीक आहे़ यामुळे ज्ञानही प्राप्त होते़ शरणागती हा भाव कासवात आहे़ प्रत्येक मंदिरात कासवाची प्रतिकृती पाहायला मिळते. या कासवाचे दर्शन प्रत्येकजण घेतात. मंदिरात कासवाचे पूर्ण लक्ष देवतेच्या चरणाकडे असते़ या सद्गुणामुळे या प्रतिकृतीचे दर्शन घेत असल्याचे दिसते़
कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़ वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संंंंंंबंधितांवर कारवाई होऊ शकते़ नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़ सुखसमृध्दीसाठी कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे़
- अनंत गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे
वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
एखाद्या मुक्या प्राण्याला बंदिस्त करून एका ठिकाणी ठेवणे हा वनविभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे़ परंतु वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या कासवाला अनेकांनी एका फीशपॉटमध्ये ठेवले असताना वनविभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर यावर कारवाई करण्याची प्रतीक्षा वनविभाग पाहत असल्याचे दारूण चित्र वनविभागात दिसत आहे़