चौकाचौकात कचरा कंटेनर गेलेत कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:20 AM2019-08-13T01:20:39+5:302019-08-13T01:22:36+5:30
शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. प्रभागनिहाय स्वच्छता कंत्राटदार करतात काय अन् यावर नियंत्रण कुणाचे, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.
मागील वर्षी डेंग्यू, स्वाइन फ्लू अन् स्क्रब टायफसच्या प्रकोपामुळे कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला. किंबहुना ते महापालिकेच्या आरोग्य विभागातील बेबंदशाहीचे बळी ठरले. यातून महापालिकेने काही बोध घेतला, असे दिसून येत नाही. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची शहराच्या आमदारांनी काल-परवा पालकमंत्र्यांसमक्ष केलेली कानउघाडणी व त्यांना कायम करण्यात येणार नाही, अशी दिलेली तंबी शहराचे आरोग्य तूर्तास ठीक नसल्याचेच निदर्शक आहे. त्यामुळे उपायुक्त, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी अन् डझनावरी स्वास्थ्य निरीक्षकांची फळी करतेय काय, असा सवाल अमरावतीकरांचा आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रभाग, झोनमध्ये दिलेल्या गृहभेटी कागदोपत्रीच आहेत. सर्व आजारांचे मूळ असलेल्या डासांची उत्पत्ती थांबविण्याच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी यामध्ये सातत्य नाही. सर्व अधिकारी कंत्राटदारांचे बटीक असल्यासारखे वागतात. त्याचा साधा कर्मचारीही आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत.
नाल्या, कच्च्या नाल्यांची नियमित स्वच्छता नाहीच. कित्येक ठिकाणी कचरा गोळा करणारे वाहन पोहचत नाही. अधिकारी, पदाधिकारी अन् नगरसेवकांना भेटीदरम्यान स्वच्छता सुरू असल्याचा केवळ दिखावा केला जातो. हेच शहराचे वास्तव आहे.
जागोजागी तुंबली गटारे अन् डबकी
पावसाच्या १५ दिवसांच्या झडसदृश स्थितीमुळे दोन महिन्याची सवड मिळालेल्या आरोग्य विभागाची लक्तरे वेळीवर टांगली गेली आहेत. ठिकठिकाणी तुंबलेली गटारे आणि पावसामुळे रिक्त प्लॉटमध्ये झालेली तळी आरोग्यसेवेची वाट लावणार आहे. या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये, यासाठी ना केमिकल टाकले जात, ना पाणी काढले जात आहे. अर्जुननगर ते शेगाव रस्त्यावर पाण्याच्या टाकीमागे रिक्त प्लॉटवर गटार आहे.
फॉगिंगचे फोटोशेसन किती वेळा?
प्रत्येक कंत्राटदाराजवळ पाच फॉगिंग मशीन अनिवार्य आहेत. ज्यावेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटी होतात, त्यावेळी फॉगिंग सुरू असल्याचे फोटोशेसन केले जाते. नागरिकांच्या सह्यांचे रजिस्टर पूर्ण केले जाते. या सह्यांची व कंत्राटदाराजवळ आवश्यक पाच फॉगिंग मशीन असल्याची खातरजमा आरोग्य विभागाने केलेली नाही.
फाईल चोरीपर्यंत कंत्राटदारांची मजल
प्रभाग कंत्राट हे ‘राजाश्रया’ने मंजूर झालेत. यामध्ये निविदाप्रक्रिया ही लिपापोती ठरल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कंत्राटदार एवढे शिरजोर झालेत की, प्रतिस्पर्ध्याची फाइल चक्क लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून गायब केली जाते. कोणी हा कारनामा केला, हे फुटेजमध्ये निष्पन्न झाले. कंत्राटदारांची मजल कुठवर अन् अधिकाºयांचे नियंत्रण कितपत, हा विषय प्रशासनातच नव्हे, तर शहरातदेखील चर्चेचा बनला आहे.