रस्त्यांच्या ‘साइड शोल्डर’चा मुरुम गेला कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:21 AM2019-08-04T01:21:01+5:302019-08-04T01:21:25+5:30
शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रकारामुळे दररोज अपघात होत आहेत तसेच रस्तादेखील काठाने तुटत असल्याची बाब गंभीर आहे.
रस्त्याच्या निधी कोणी आणला, याचे श्रेय लाटण्यासाठी सर्वच पक्षांतील पदाधिकाऱ्यांत अहमहमिका लागल्याचीे कित्येक उदाहरणे आहेत. मात्र, रस्ता कसा होत आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. विशेष म्हणजे, महापालिका असो वा सार्वजनिक बांधकाम विभाग, या कामांवर अभियंता सापडणे दुर्मीळच. यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून वर्ष-दोन वर्षातच खड्डे पडले, तर कित्येक रस्त्यांवर साइड शोल्डरदेखील भरले गेले नाहीत. या साइड शोल्डरचे बिल अभियंत्यांनी काढले नाही काय की यामध्येही ‘फिप्टी-फिट्टी’चा मामला आहे, असा नागरिकांचा आक्षेप आहे.
नियमानुसार रस्त्याचे काम झाल्यानंतर १.२ मीटरपर्यंत शोल्डर मुरुमाने भरले गेले पाहिजेत. मात्र, काही ठिकाणी थातूरमातूर मुरूम टाकला, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे रस्ते उंचावर, तर शोल्डर सहा इंच ते फुटभर खाली असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बियाणी चौक ते तपोवन दरम्यान यंदा रस्ता करण्यात आला. अत्यंत वर्दळीचा या रस्त्यावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर साइड शोल्डर भरले गेले नाही. महापालिकेच्या अर्जुननगर ते शेगाव रस्त्यावर पाण्याच्या टाकीमागे साइड शोल्डर एक ते दीड फूट खाली आहे. वाहन या रस्त्याखाली उतरल्यास अपघात ठरलेलाच आहे. किंबहुना दररोज असे प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, या प्रभागाच्या नगरसेवकाच्या घरामागेच साइड शोल्डरची हालत खराब आहे. महापालिका पदाधिकारी या प्रकाराबाबत कितपत गंभीर आहेत, असा आरोप नागरिक करीत आहेत.
‘आयआरएस’च्या निकषांचे उल्लंघन
इंडियन रोड काँग्रेस (आयआरएस) च्या निकषानुुसार रस्त्याला १.२ मीटर म्हणजेच चार फुटाचे साइड शोल्डर अनिवार्य आहे. चारचाकी वाहन जाऊ शकेल किंवा नादुरुस्त असल्यास उभे ठेवता येईल तसेच रस्त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी हे अंतर आहे. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांचे फावले.
शोल्डरअभावी नवीन रोड लागले तुटायला
उन्हाळ्यात रस्त्यांची कामे अत्यंत घिसाडघाईने करण्यात आली आहेत. काही कामे तर लोकसभा निवडणूक आचारसंहिता लक्षात घेऊन लगबगीने करण्यात आली. त्यावेळी या कामांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. काही ठिकाणी साइड शोल्डरसाठी मुरूम टाकला गेला, तर काही काही ठिकाणी दिरंगाई करण्यात आली. या ठिकाणावरून अमृत योजनेची पाइप लाइन व महावितरणची केबल टाकण्यात आल्यामुळे साइड शोल्डर दोन वेळा खोदण्यात आले. आता त्यामध्ये अंतर पडल्याने काठाने रोड तुटत आहेत.