१८ वर्षांनंतर ही मुले जातात कुठे? विचारांनीच सुटतो थरकाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:28+5:30
गजानन मोहोड । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ज्यांचे या जगात कुणीही नाही, अशी ही मुले वयाच्या अठराव्या वर्षांनंतर ...
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्यांचे या जगात कुणीही नाही, अशी ही मुले वयाच्या अठराव्या वर्षांनंतर कुठे जात असतील, या विचारांनी थरकाप सुटतो. आपल्या हयातीत यासाठी कायदा व्हावा, अशी शासनाकडून माफक अपेक्षा. बंधने नकोत, यामुळे आपण शासनाचे अनुदान व कुठला पुरस्कार स्वीकारला नसल्याचे स्पष्ट अन् परखड मत १२३ अनाथ, मतिमंद, मूकबधिर, अंध अन् बहुविकलांगांचा बापमाणूस शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केले.
राज्याच्या विविध भागांतील अनाथ मुलांना स्वत:चे नाव देऊन, स्वावलंबी करून शंकरबाबांनी त्यांना जगण्याचा नवा मंत्र दिला. शंकरबाबांच्या अशा २१ मुलींची लग्न झालीत. त्यांना २५ नातू आहेत. या सर्व कन्या संसारात सुखी आहेत. बाबांनी या सर्वांचे जनधन योजनेत खाते काढले. आधार कार्डमध्ये पिता म्हणून स्वत:चे नाव दिले. १०० मुलांना आता मताधिकार मिळाला. सर्वांचे रहिवासी दाखले वझ्झर येथील आहेत. त्यांचा विदूर नागपूर विद्यापीठात संगीतात एमए करतोय. गांधारीने संगीताच्या पाच परीक्षा दिल्यात. माला एमपीएससीची तयारी करते. अंध व मूकबधिरांना साक्षर व स्वावलंबी केले. त्यांचा समाजाशी संबंध फारसा येत नाही; पण सर्व जण एक कुटुंब म्हणून राहतात. वझ्झर आश्रमाच्या २५ एकरात या सर्वांनी १५ हजार झाडे लावलीत. यातील पाच हजार कडुनिबांची आहेत. प्रभाकरराव वैद्य यांच्याकडून किराणा मिळतो. विजेचे बिल, कपडे, औषधी व प्रवासाचा खर्च संत गजानन महाराज संस्थानद्वारे शिवशंकरभाऊ पाटील देतात. इर्विनची टीम दरमहा सर्वांची आरोग्य तपासणी करते. जिल्हाधिकारी, सीएस, एसडीओ अन् तहसीलदार यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याचे बाबांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आश्रमात २० किलो कडुनिंब पाल्याचा सकाळ व सायंकाळी धूर केला जातो. याशिवाय १० किलो पाल्याचा एक लिटर पाण्यात अर्क काढला जातो. हेच मुलांचे सॅनिटायझर असल्याचे बाबा म्हणाले.
-जगातल्या तमाम वडिलांना विनंती आहे, कुठेही बहुविकलांग दिसला की, त्याला प्रेम द्या. त्याच्या पाठीवर प्रे्रमाचा हात फिरवा. त्याला सहकार्य करा. शासनाने या अनाथ मुलांना १८ वर्षांनंतरही आश्रमात राहता यावे, यासाठी कायदा करावा. दरवर्षी अशा एक लाखांवर मुलाचा मृत्यू होतो.
- शंकरबाबा पापळकर
वझ्झर, ता. अचलपूर
२५ वर्षांपासून कुटुंबापासून दूर
शंकरबाबांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मात्र, या अनाथ मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी २५ वर्षांपासून त्यांनी स्वत:ची मुले, भाऊ, बहीण आदींची भेट घेतलेली नाही. मुलगी अमरावतीला, तर मुलगा यवतमाळला असल्याचे बाबा म्हणाले.
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा अनाथ मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!