कुठे अतिवृष्टी तर कुठे रिमझिम; अद्यापही १३.५ टक्क्यांची तूट
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 22, 2023 05:04 PM2023-07-22T17:04:11+5:302023-07-22T17:06:43+5:30
खरिपाची ६.४१ लाख हेक्टरमध्ये पेरणी
अमरावती : आठवडाभरापासून कुठे अतिवृष्टी तर कुठे रिमझिम पाऊस होत आहे. जिल्ह्यात १ जूनपासून ३४२.६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २८६ मिमी पावसाची नोंद झाली. ही ८३.५ टक्केवारी आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याची सरासरी पार होण्याची शक्यता आहे.
मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब लागल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे ६ जुलैपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाल्यानंतर पेरण्यांना सुरुवात झालेली आहे. सद्य:स्थितीत सरासरीच्या ९४ टक्के म्हणजेच ६.४० लाख हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. या आठवड्यातील पावसाने ४०० हेक्टर जमीन खरडून गेलेली आहे. याशिवाय १२ हजार हेक्टरमधील तूर, कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.