जिल्हा चिंब भिजला असताना नंदनवन माघारलेे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:23+5:302021-09-17T04:17:23+5:30
अमरावती : पावसाळा संपत असताना पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. या ...
अमरावती : पावसाळा संपत असताना पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा मात्र, पावसाच्या सरासरीत शेवटच्या स्थानावर आहे. अजूनही चार तालुके पावसाच्या अपेक्षित सरासरीत माघारले आहेत.
जिल्ह्यात १५ सष्टेंबरपर्यत ६८८.७ मिमी पाऊस अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ७८७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ११४.३ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद सध्या झालेली आहे. सर्वाधिक ८५४.२ मिमी पावसाची नोंद नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेली असली तरी अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५०.५ टक्के पावसाची नोंद अंजनगाव सुर्जी तालुक्यात झालेली आहे. सर्वात कमी ५९.४ टक्के पाऊस चिखलदरा तालुक्यात झालेला आहे. या तालुक्यात आतापर्यत १२७९.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ७६० मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
‘महावेध’च्या माहितीनुसार धारणी ७३.६ ,चिखलदरा ५९.४, धामणगाव रेल्वे ९७.९ व अचलपूर तालुक्यात आतापर्यत ८६ टक्केच पाऊस झालेला आहे. याशिवाय अमरावती १०६.८, भातकुली १२५.१, नांदगाव खंडेश्वर १२४, चांदूर रेल्वे १२८.४, तिवसा ११८.५, मोर्शी १०३.७, वरुड ११४.८, दर्यापूर १३८.३, अंजनगाव सुर्जी १५०.५ व चांदूर बाजार तालुक्यात ११८.१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
बॉक्स
१८ पासून पावसामध्ये येणार कमी
कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र डिप्रेशन(वादळ) मध्ये झालेले आहे व या वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याने विदर्भातील पावसाचे प्रमाण हळुहळू कमी होणार आहे. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर १८ सप्टेंबर पासून पावसाचे प्रमाण बरेच कमी होणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.