मोबाईल गेम खेळताना नातवाचा आजोबांच्या पैशावरच डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:31+5:302021-07-14T04:16:31+5:30

अमरावती : मोबाईलवरून ऑनलाईन गेम खेळताना वेगवेगळे युकुपमेंट विकत घेत आपली रॅन्क वाढविण्यासाठी एका नातवाने आपल्या आजोबाच्या खात्यातून एक-दोन ...

While playing mobile games, the grandson relies on his grandfather's money | मोबाईल गेम खेळताना नातवाचा आजोबांच्या पैशावरच डल्ला

मोबाईल गेम खेळताना नातवाचा आजोबांच्या पैशावरच डल्ला

Next

अमरावती : मोबाईलवरून ऑनलाईन गेम खेळताना वेगवेगळे युकुपमेंट विकत घेत आपली रॅन्क वाढविण्यासाठी एका नातवाने आपल्या आजोबाच्या खात्यातून एक-दोन नव्हे तर चक्क एक लाख ८४ हजार रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा सर्वव्यापी झाला आहे. कुठलेही तंत्रज्ञान वापरताना त्याची जोखिमही माहीत असणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मुलांना स्वतंत्र मोबाईल दिले आहेत. मात्र, मोबाईल व इंटरनेटच्या महाजाळात अनेक चुकीच्या गोष्टीही दडलेल्या आहेत. त्यातील एक मोबाईलवरील गेम्स आहे. आज अनेक मुलांना या गेम्सने पछाडले असून, पालकांना याची भनकही असते. वरील घडलेल्या घटनेतून मुले गेम्सच्या नादात घरातच चोरी करायला लागले, हे स्पष्ट होते. वरुड तालुक्यात घडलेल्या या घटनेत नातवाने आपल्या आजोबांच्या खात्यावरच एक लाख ८४ हजार ०९३ रुपयांचा डल्ला मारला. गेम खेळत असताना आपली रॅन्क वाढविण्यासाठी त्याने आजोबांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल वापरून ही रक्कम संबंधिताच्या खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब लक्षात येताच आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले. तपासाची चक्रे फिरविण्यात आली. अखेर नातवानेच ही रक्कम वळती केल्याचे निष्पन्न झाले.

उच्चभ्रू कुटुंबातील पालक त्यांच्या ई-वाॅलेटमधून पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी घेऊन सायबर सेलमध्ये पोहोचतात. आतापर्यंत असे अनेक प्रकार उघड झाले. मात्र, मुलाच्या बाबतीत भविष्याचा विचार करून पालकांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. सुरुवातीला मजेशीर वाटणारे खेळ कसे घातक वळण घेतात, याचे हे उदाहरण आहे. फ्री-फायर, पब्जी यासारख्या ओपन वाॅर गेम्समध्ये मुले गुरफटत जातात. ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मित्रांना ऑनलाईन बोलावून हा गेम खेळला जातो. सुरुवातीला सिस्टीमसोबत गेम खेळून पुढच्या पायरीवर ऑनलाईन खेळ सुरू होतो. येथे मग स्पर्धा लागते, ती शस्त्र खरेदीची. युद्धाचा विचार डोक्यात इतका भिनला जातो की, मुले आई-वडील व कुटुंबापासून अनाहुतपणे दूर जातात. हा प्रकार सहज पालकांच्या लक्षात येत नाही.

मुलांनी मोबाईलचा मर्यादित वापर करावा, पालकांनी मुलाला मोबाईल देताना त्यातील काही फिचरचा वापर करता येतो. शक्य झाल्यास मुलांना घरात काॅम्प्युटर देऊन त्यावर ऑनलाईन क्लासेसपुरतेच इंटरनेट द्यावे. पालकांनी मोबाईलचा वापर हा जबाबदारीने करणे गरजेचे आहे. सर्च हिस्ट्रीमध्ये मोबाईलवर काय पाहण्यात आले, हे दिसते. मुले पालकांचा मोबाईल सहज हातात घेतात. किशोरवयात असलेल्या मुलांची अनावश्यक बाबींवर नजर पडते. त्यामुळे मुलांच्या अगोदर पालकांनी स्वत:ला शिस्त घालणे आवश्यक झाले आहे.

- मुलांमध्ये पेरलं जातय गुन्हेगारीचं बीज. मोबाईल गेम्सचे व्यसन जडल्याने मुले बंडखोर होत आहेत.

- मुलाला एखाद्या दिवशी मोबाईलवर गेम खेळायला मिळाला नाही तर त्याची चिडचिड होते.

- मुलांची भूक मंदावल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. यामागे मोबाईलचे व्यसन हे एक महत्त्वाचे कारण आहे.

- मोबाईल वापराची शिस्त पालकाने स्वत: घालून घेणे गरजेचे आहे. तर त्यांचे अनुकरण मुले करतात.

अशी घ्या खबरदारी

- मोबाईलमध्ये पॅरेन्टलमोड ही सेटिंग आहे. त्या माध्यमातून ॲप्सच्या वापरावर निर्बंध घालता येतात. प्रत्येक ॲपला पासवर्ड टाकता येतो. जेणेकरून मुलगा ऑनलाईन क्लास करताना पालकांची नजर चुकवून इतर कोणतीही गोष्टी वापरू शकत नाही. याशिवाय इंटरनेटचा डाटा लिमिट ऑप्शन ऑन करून ठेवावे. नेट संपल्यानंतर काही करता येत नाही.

Web Title: While playing mobile games, the grandson relies on his grandfather's money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.