कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:27+5:302021-06-25T04:10:27+5:30
प्रसंग जिल्हा बँकेतील एका ग्रामीण शाखेचा. दोन हजार रुपये खात्यात आले, ते काढले नाही तर परत जातील, असा दृढ ...
प्रसंग जिल्हा बँकेतील एका ग्रामीण शाखेचा. दोन हजार रुपये खात्यात आले, ते काढले नाही तर परत जातील, असा दृढ समज. त्यामुळे धावपळ करत वृद्धावस्थेकडे वाटचाल करीत असलेल्या गृहस्थाने बँक गाठली. आधी खिडकीपुढील रांगेत लागून बॅलेन्स चेक केले. त्यानंतर बँकेच्या रांगेत लागले. काऊंटरवर त्यांना केवायसी करायची आहे, असे सांगितले. त्यासाठी अर्जाला आधार कार्ड झेरॉक्स जोडून पुन्हा रांगेत लागले. पण, नुसते आधार कार्ड नाही, तर मतदान कार्डही हवे, अशी जवळजवळ करड्या आवाजातील सूचना त्यांना करण्यात आली. मुकाट सर्व ऐकून घेणारे गृहस्थ आता मात्र संतापले. मी एमए आहे आणि चष्मा न लावताही केवायसीच्या अर्जातील 'किंवा' हा शब्द स्पष्टपणे दिसतो. एक कोटी रुपयाची माझी शेती अन् तुझा मोदी दोन हजारासाठी मला दिवसभर बँकेत उभा ठेवतो काय, असे म्हणत हातातील कागद बँकेच्या काउंटरवर भिरकावत त्यांनी गावाचा रस्ता धरला. समदुःखी व्यक्तींनी त्यांच्या या कृतीचे मनोमन समर्थन केले.
धीरेंद्र चाकोलकर, अमरावती