कुजबुज सदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:24+5:302021-08-26T04:15:24+5:30
कुठल्याही राज्य किंवा आंतरराज्य महामार्गावर गेल्यास वाहनांना टोल लागतोच. ठिकठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. विविध पक्षांच्या आंदोलनानंतर अनेक ठिकाणी ...
कुठल्याही राज्य किंवा आंतरराज्य महामार्गावर गेल्यास वाहनांना टोल लागतोच. ठिकठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. विविध पक्षांच्या आंदोलनानंतर अनेक ठिकाणी बंदसुद्धा झाले. परंतु, अमरावती-नागपूर महामार्गावर किमान तीन टोल नाके लागतात. या मार्गाने नांदगावपेठ येथे मेळघाटातील काही लग्न वऱ्हाडी गेले. परतवाडा ते अमरावती असा प्रवास सुखरूप झाला. अमरावती-नागपूर मार्ग लागतात टोल नाका आला. वाहन थांबले. पैसे द्या आणि पुढे चला, असा हा टोलवाल्यांचा कायदा. मेळघाटातील लोक म्हणाले, आम्ही लग्नाला चाललो. तुम्ही कुठेही जा, मात्र टोल द्या, हा निर्धार कायम. हो-ना करता-करता पावती फाटली. कारण त्या गाडीच्या मागे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मग काय उशीर करण्यापेक्षा एकाने पैसे काढून देऊन टाकले. वाहन लग्नमंडपात आले. लग्नात गेले. ‘काय राजेहो... लग्नाचा टोल?’ असे म्हणत नवरदेवाकडून वसुली केली. आता लग्न कुठे आहे, कोणत्या गावात आहे, टोल किती लागतो, हे सर्व विचारून पत्रिकेसोबत टोलचे पैसे घेण्यात येतात, हे विशेष.
- नरेंद्र जावरे