श्वानांना पांढऱ्या-काळ्या रंगांचीच ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:36 AM2019-08-08T01:36:34+5:302019-08-08T01:36:57+5:30
श्वानांना केवळ पांढरा व काळा या दोन रंगांचीच जाण असते. त्यांना लाल रंग कळतच नाही. त्यामुळे घरासमोरील फाटकावर लाल पाण्याची बॉटल लटकविण्याचा प्रकार हा मूर्खपणाचा कळस आहे. गैरसमजातून असले प्रकार नागरिक करीत असल्याचा दावा प्राणिप्रेमींनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्वानांना केवळ पांढरा व काळा या दोन रंगांचीच जाण असते. त्यांना लाल रंग कळतच नाही. त्यामुळे घरासमोरील फाटकावर लाल पाण्याची बॉटल लटकविण्याचा प्रकार हा मूर्खपणाचा कळस आहे. गैरसमजातून असले प्रकार नागरिक करीत असल्याचा दावा प्राणिप्रेमींनी केला आहे. शहरातील अनेक घरासमोर लाल पाण्याची बॉटल लटकविली असतानाही तेथे श्वान ठाण मांडून बसतात. तेथे घाण करून ठेवतात, असे आढळून आले आहे.
पावसाळ्यात श्वान घरासमोरील दाराशी बसून घाण करीत असल्यामुळे अनेक नागरिक फाटकावर कुंकु मिश्रित लाल पाण्याची बॉटल लटकवित आहेत. या प्रकाराबाबत पशुचिकित्सकांचे मत जाणून घेतले असता, श्वानांना केवळ काळा व पांढरा रंग असे दोनच रंग कळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाल पाणी पाहून श्वान थांबत नसल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला कसा, याबाबत प्राणिप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पावसाळा हा श्वानांच्या मीलनाचा काळ असतो. त्यामुळे मादी श्वानांचा मागोवा घेत गल्लीबोळात ते फिरत असतात. मादी ज्या ठिकाणी थांबते, त्याच ठिकाणी श्वान गर्दी करतात. अशावेळी श्वान तेथेच घाण करून ठेवतात. मात्र, श्वानांनी घाण करू नये, यासाठी अशिक्षित व सुशिक्षित नागरिकांनी एकाच पातळीवर येऊन लाल पाण्याचा प्रयोग केला आहे. अंधानुकरणातून हा प्रकार शहरभर पसरला. अनेकांनी आपआपल्या घरासमोर लाल पाण्याची बॉटल लकटवून ठेवली आहे. मात्र, लाल पाणी बॉटल असतानाही तेथे श्वान बसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे लाल पाण्याचा श्वानांवर काही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे.
श्वानांना पांढरा व काळा रंगच ओळखता येतो. त्यांना लाल रंगाविषयी कळतच नाही, तर ते लाल पाण्याला भिणार तरी कसे? नागरिकांनी उगाचच लाल पाणी घरासमोर लकटविण्याचा गैरसमज करून घेतलेला आहे.
- शुभम सांयके, प्राणिप्रेमी.