तीन जिल्ह्यांतील मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन ठरल्या पांढरा हत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:05 PM2017-11-11T21:05:40+5:302017-11-11T21:05:54+5:30
गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुरावे त्वरित घेता यावेत, याकरिता राज्य शासनाने ४५ ठिकाणी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या आहेत.
अमरावती - गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुरावे त्वरित घेता यावेत, याकरिता राज्य शासनाने ४५ ठिकाणी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या आहेत. अमरावती विभागात सहा व्हॅन देण्यात आल्या. मात्र, तीन जिल्ह्यांतील मोबाइल व्हॅन या सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ही पदे भरली नसल्याने पांढरा हत्ती ठरल्या आहेत.
खुनाचा गुन्हा, बलात्कार, अंमली पदार्थ व इतर महत्त्वाच्या एखाद्या गुन्ह्यात घटनास्थळावरील रक्ताचे नमुने वा इतर गुन्ह्यांतील कलेक्शन योग्य पद्धतीने घेण्याचे ज्ञान पोलिसांना नसते. ही कार्यवाही शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आल्या आहेत. विभागात मागील वर्षी अमरावती येथे पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक स्तरावर दोन, तर इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक अशा सहा मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आल्या.
तथापि, यासाठी महत्त्वाची सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ची कायमस्वरूपी पदे शासनाने भरली नाहीत. केवळ बुलडाणा व अकोला येथे कंत्राटी नेमणूक करण्यात आली आहे. विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुराव्यांची हाताळणी योग्य न झाल्याच्या स्थितीत अमरावती येथील प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पुराव्यांचे अचूक विश्लेषण होत नाही. मात्र, तरीदेखील सहायक रासायनिक विश्लेषकाची पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप कार्यवाही केली नाही.
विभागात अमरावती येथे पोलीस आयुक्तालय आहे. शहराचा आणि एकंदर जिल्ह्याचा आवाका मोठा असताना येथेही पदे रिक्त आहेत. अमरावती शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यात प्रादेशिक न्यायसाहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (अमरावती) येथील अधिकाºयांना घटनास्थळावर पाचारण केले जाते. मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनसाठी दिलेली पदे त्वरित भरली, तर अनेक महत्त्वाचे गुन्हे उघड होण्यास मदत होईल.
अत्याधुनिक किटचा वापर
फॉरेन्सिक मोबाइल व्हॅन गुन्हा घडल्यानंतर त्वरित घटनास्थळावर नेऊन रक्तांचे नमुने, हाताचे ठसे व गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर साहित्य जप्त केले जाते. व्हॅनमध्ये सदर नमुने घेण्यासाठी अत्याधुनिक किट देण्यात आली आहे.
पुढील महिन्यात कंत्राटी पदभरतीची शक्यता
शासनाने आॅक्टोबरमध्ये रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात काढली. पुढील आठवड्यात यासाठी परीक्षा होणार असल्याची माहिती आहे. सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ची कायमस्वरूपी पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. तोपर्यंत कंत्राटी पदांवरच कारभार चालवावा लागणार आहे.
अमरावती जिल्ह्यात पोलिसांकडून माहिती मिळताच आम्ही मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचा वापर करून घटनास्थळ गाठतो. इतर जिल्ह्यात पोहोचणे शक्य होत नाही. प्रत्येक जिल्ह्यात पाच पोलिसांच्या पथकाला किट कशी वापरावी, याचे ज्ञान दिले आहे.
विजय ठाकरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती