कपाशीवर पांढरी माशी घोंगावते

By admin | Published: September 2, 2015 12:05 AM2015-09-02T00:05:15+5:302015-09-02T00:05:15+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असताना कपाशीवर पांढऱ्या माशीने आक्रमण केल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे

The white fly nets on cotton | कपाशीवर पांढरी माशी घोंगावते

कपाशीवर पांढरी माशी घोंगावते

Next

शेतकऱ्यांची चिंता वाढली : कृषी विभागाकडून उपाययोजनेची अपेक्षा
सुनील देशपांडे अचलपूर
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असताना कपाशीवर पांढऱ्या माशीने आक्रमण केल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून कपाशीकडे बहिघतले जात असल्याने हजारो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी निसर्गाने धोका दिल्याने सोयाबीन पिकांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे यावर्षी बऱ्यापैकी कपाशीचा पेरा झाला आहे. भारनियमनासोबत पाण्याचाही प्रश्न असल्याने पांढऱ्या माशीने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी नंतर एक महिना दडी मारली होती. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. काही भागात अजूनही पिकांची वाढ पुरेशी झालेली नाही. प्रतीक्षेनंतर पावसाचे पुन्हा आगमन झाले असले तरी विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली नाही. त्यात ग्रामीण भागातील भारनियमन या दोन कारणांमुळे ओलीताचे प्रमाण कमी झाले आहे. पुन्हा पावसाने दडी मारल्याने सूर्याच्या प्रकाशाने जमीन कडक झाली आहे. याकरिता शेतकरी पावसाच्या पाण्याच्या भरवशावर न राहता स्प्रिंकलरसारखे वेगवेगळ्या मार्गाने शेतातील पिकाला पाणी देत आहेत.
एकीकडे शेतातील पिके जगवणे व दुसरीकडे कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, अशी दुहेरी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. सध्या कपाशीला फुले व पात्या धरायला सुरूवात केली आहे. सुरुवातीला कपाशीवर रोग नव्हता. पण ऐन पीक जोमात यायला लागल्यावर पांढऱ्या माशीपासून निर्माण होणाऱ्या अळीला बळी पडावे लागणार असल्यामुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. अजून अळी पडली नसली तरी ती पडण्याची चिन्हे दिसत आहेत. काही बियाणे, कंपन्या कपाशीवर रोग पडणार नाही, असा प्रचार करीत असल्या तरी पांढऱ्या माशीचे जोरात आक्रमण झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक झळी सहन करावी लागणार आहे.

कृषी विभागाचे सर्वेक्षण नाही
कोणत्याही पिकावर रोग येण्याची लक्षणे दिसू लागताच कृषी विभागाने सर्व्हे करून त्याची अहवाल तत्काळ सरकारकडे द्यायला हवा व त्यावर उपाययोजनाही व्हायला पाहिजे. तशा सूचना शासनाने कृषी विभागाला द्याव्यात. असे मत प्रशांत रेखाते, गुड्डू कपले, अनिल निचत, सुधीर कपले, श्याम पोटे, विकास रेखाते, राव मानकर, गजानन मेहरे, विनय महेरे, जनार्धन पोटे आदी युवा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

शेतकरी निसर्गाच्या कोपाने त्रस्त असताना पांढऱ्या माशीचे संकट त्याच्या डोक्यावर घोंगावत आहे. ही सुरुवात असली तरी पांढऱ्या माशीचे संकट केव्हाही उग्ररुप धारण करू शकते. कित्येकदा कृषीवरील रोगनाशक औषधेही निकामी ठरतात. हे संकट थांबविण्यासाठी कृषी विभागाने आतापासून कामाला लागावे.
- श्रीधर क्षीरसागर,
शेतकरी.

सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही. शेतातील पिकांवर संकटाची चाहूल लागताच त्यावर उपाययोजना केल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडत नाही. कृषी विभागाने पांढऱ्या माशीचे संकटावर आतापासून उपाययोजना केल्यास पिके निकोप राहतील व शेतकरी आर्थिक संकटावर मात करण्यास सक्षम बनतील.
- अतुल लकडे,
पुरस्कारप्राप्त शेतकरी.

कपाशी पिकावर येणाऱ्या पांढऱ्या माशीची चाहूल लागली आहेत. काही भागांत सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने त्यावर आताच उपाययोजना केल्यास पांढऱ्या माशीचे संकट येणार नाही. शेतकरी अगोदरच खचला आहे. याची जाण कृषी विभागाने ठेवावी.
-बाळासाहेब गणगणे,
शेतकरी.

Web Title: The white fly nets on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.