पांढरे सोने @ ९००० पार; शेतकऱ्यांकडे कापूस आहे तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:53 PM2022-11-15T23:53:16+5:302022-11-15T23:54:20+5:30
परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत. शेतकऱ्यांची याच पिकांवर मुख्य मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना परिसरात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते, पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.
किशोर मोकलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पूर्णा : सध्या शिवारात कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. या पांढऱ्या सोन्याला खेडा खरेदीत सध्या नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उतारा घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारीपश्चात भाववाढीची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
मागच्या हंगामात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यामुळेच यंदा कपाशीची क्षेत्रवाढ झाली. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने कापसाच्या उताऱ्यात ५० ते ६० टक्क्यांनी घट येत आहे. उत्पादन घटल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.
परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत. शेतकऱ्यांची याच पिकांवर मुख्य मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना परिसरात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते, पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापूस वेचणीला सुरुवात झाली, परंतु, कापसाचा उतारा एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस निघाला. अनेक गावांत पावसाने नुकसान होऊन त्या गावांना शासन मदत मिळाली नाही.
उतारा घटला, आवक वाढेना
जिल्ह्याच्या काही भागात कुठे सीतादई होत आहे. बोंडअळीने बोंड खराब झाले आहे. वेचणी दहा रुपये किलोवर गेली, तरीही मजूर मिळत नाही, काही भागात दोन वेच्यात उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. दरवाढ होत असतांना शेतकऱ्यांच्या घरात कापूस नाही, खेडा खरेदीत लूट सुरुच आहे.
शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले, शासन मदत मिळावी
प्रमुख पिकांचे अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले. बियाणे, लागवड, फवारणी, वेचणीचा खर्च बघता उत्पादन खर्चदेखील निघणार नाही. परिणामी , शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट यंदा कोलमडले आहे. त्यामुळे पावसाच्या नुकसानीसाठी शासनाने मदत निधी उपलब्ध करावा व सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, असे विरुळ पूर्णा येथील शेतकरी सुमीत बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या आठवड्यात सीतादई झाली, पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात बोंडअळीनेही नुकसान केले. वेचणीही वाढली, खेडा खरेदीत दर वाढले तरीही शेतकऱ्यांकडे कापूस नाही. मोठी विवंचना ठाकली आहे.
- रावसाहेब खंडारे, शेतकरी