पांढरे सोने मातीमोल
By admin | Published: January 22, 2015 12:19 AM2015-01-22T00:19:15+5:302015-01-22T00:19:15+5:30
खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही.
अमरावती : खरिपाचे सोयाबीन उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. प्रत्यक्षात बाजारात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर ४०५० रुपये या हमीभावाच्यावर दर पोहोचलेच नाही. या आठवड्यात कापसाचे भाव पाडण्यात आले. ग्रामीण भागात ३५०० ते ३८०० रुपये भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. मंगळवारी अमरावती बाजार, समितीमध्ये कापूस ३८०० रुपयांनी विकला गेला. केवळ सीसीआयचे व पणन महासंघाचे सात खरेदी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत असताना शासन गपगार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १ लाख ९४ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. सोयाबीननंतर हे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. खरीप हंगामात सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची सर्व मदार कापसावर होती. लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव व जमिनीत कमी झालेली आर्द्रता यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. जिरायती क्षेत्रात २ ते ३ क्विंटल व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतात ५ ते ६ क्विंटल असे उत्पादन होत आहे. कपाशीचे महागडे बियाणे, खते, फवारणी, निंदण, मशागत, वखरणी, ५ ते ६ रुपये किलोप्रमाणे वेचाई व वाहतूक खर्च असा एकूण एकरी २० ते २५ हजारांचा खर्च होत असताना उत्पन्न मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्मेच आहे. जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून कापसाची वेचाई सुरू झाली. भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांची कापसाची साठवणूक केली. प्रत्यक्षात यंदा कापसाचे भाव ४०५० रुपये या हमीभावापेक्षा कधी चढलेच नाही. मंगळवाररी बाजार समितीत ३८०० रुपये भावाने कापूस विक्री, तर खासगीत ३५०० ते ३६०० रुपयांनी कापसाची खरेदी झाली.