पांढरे सोने झाले काळे; अमरावती जिल्ह्यात दोन वेच्यातच कापसाची उलंगवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:34 AM2018-11-27T11:34:48+5:302018-11-27T11:37:43+5:30
पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. कुठे कमी पावसामुळे पीकच वर आले नाही. या पिकाची आता अखेर झाली आहे. एरवी हिवाळ्यात थंडी पडताच कपाशीला नवी बोंडे फुटतात. आणखी किती वेचे, कापूस घरी येईल, याचा अंदाज बांधला जातो. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्विग्नता आहे.
सलग दुसऱ्या वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने अमरावती जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन घटले आहे. तिवसा तालुक्यात कोरडवाहू शेतात पहिल्या वेच्यात, तर सिंचनाच्या शेतात तीन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी झाली. झाडांची वाढ खुंटल्याने बोंडांची संख्या घटली. त्यातच कपाशी पीक पूर्णपणे सुकून गेल्याने त्या बोंडांमधून किडुकमिडुक कापूस शेतकऱ्यांच्या हाती आला. भयाण परिस्थिती असताना शासकीय खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. तालुक्यात दुष्काळग्रस्त स्थिती असतानाही दुष्काळ जाहीर करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
तिवसा तालुक्यात ११,७२५ हेक्टर शेतात कपाशीची पेरणी करण्यात आली होती. आता कापूस, सोयाबीन व तूर ही तीनच मुख्य पिके शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत. तालुक्यात सिंचनासाठी अप्पर वर्धा धरणाचा कालवा गेला आहे. मात्र यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणातून एकदाच पाणी सोडण्यात आले. कपाशीची पेरणी झाल्यानंतरही पाऊस कमी प्रमाणात आला. त्यामुळे झाडांना वाढीसाठी वाव मिळाला नाही. त्यातच यावर्षीसुद्धा बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी कापसावर कीटकनाशकांची फवारणी केली. परिणामी कीटकनाशकांच्या मात्रा अधिक झाल्याने झाडांची वाढ खुंटली. झाडांचा पसारा न वाढल्याने बोंडांची संख्या कमी झाली आहे. परिणामी यावर्षी बोंडअळीचा प्रकोप नसूनही कापसाचे उत्पादन घटले आहे. उलट शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशकांवर खर्च केल्याने मशागतखर्चात वाढ झाली आहे. कापसाला प्रतिक्विंटल किमान आठ हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.