पांढरे सोने झाले काळे; कापसाच्या पेऱ्यात ४० टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:47 AM2018-11-27T11:47:57+5:302018-11-27T11:48:29+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यात गतवर्षीचा कापसाचा अनुभव लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा नियंत्रित ठेवला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेºयात चाळीस टक्के घट होती. यावर्षीचे अवर्षण आणि सरासरीपेक्षाही कमी पावसामुळे जमिनीची ओल झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम पिकावर झाला. तीन ते चार वेच्यातच कापसाचे शेत रिकामे झाले आहे.
सद्यस्थितीत खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ५५०० ते ५८०० पर्यंत प्रतवारीनुसार दर आहे. मागणी आणि भावसुद्धा वाढतील, या आशेने अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्या घरात शेतकऱ्यांनी कापूस साठविला आहे. सणासुदीसाठी व आवश्यक कामांसाठी फक्त चाळीस टक्केच कापूस बाजारात आला. कापसाचे भाव सहा हजार ओलांडतील, अशीही शेतकऱ्यांना आशा आहे. सुगी दराच्या शेतीशास्त्रानुसार ही अपेक्षा रास्त आहे. कमी पावसामुळे तसेही उत्पन्नात जबर घट आहे.
कमी पावसाचा फटका रबी हंगामालासुद्धा बसल्यामुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक नियोजन संकटात आहे. तूर, हरभरा, कांदा, गहू, संत्रा आदी पिकांचे भविष्य अनिश्चित आहे. त्यामुळे अंजनगाव तालुका ‘दुष्काळसदृश’ म्हणता, दुष्काळग्रस्त घोषित करणे अत्यावश्यक आहे.