पांढरे सोने झाले काळे; वेचणीच्या काळातच लाल्याचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:54 AM2018-11-27T11:54:43+5:302018-11-27T11:57:11+5:30
धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. त्यापाठोपाठ तूर आणि सोयाबीनची पेरणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कपाशीचे पीक उत्तम अवस्थेत असताना, परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे .
पहिल्या वेचणीनंतर साधारणपणे दुसऱ्या वेचणीत उत्पादन वाढत असल्याचे गणित असताना, यंदा दुसऱ्या वेचणीतच शेतातील कापूस संपला. साधारणपणे एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या वेचणीच्या दोन किंटलवर समाधान मानावे लागले. सुरुवातीला कापसाचे पीक समाधानकारक मानले जात होते. यानंतर तालुक्यातील चार मंडळांपैकी धारणी व हरिसाल या दोन कृषी मंडळांमध्ये लाल्याने कहर केला. केवळ सावलीखेडा आणि धूळघाट रोड या मंडळात कापसाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
धारणी तालुक्यात कापूस खरेदी केंद्र पाच-सात वर्षांपासून बंद आहे. खासगी बाजारात शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यंदा कापसाला पाच ते साडेपाच हजार रुपयांपपर्यंत दर आहे. कर्जाची परतफेड आवश्यक असल्याने कापूस व्यापाऱ्यांच्या कह्यात जात असून, काही निवडक मोठ्या शेतकऱ्यांनीच गंजी करून ठेवला आहे.
कापसाला बाजारच नाही
धारणीत कापसाची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक खासगी व्यापाऱ्यांनाच विकावा लागतो. काही शेतकरी अकोट, मध्य प्रदेशातील देडतलाई, तुकईथड, बºहाणपूर, खंडवा येथे कापूस विकतात. सध्या धारणी शहरात ५२०० रुपये, तर मध्यप्रदेशात ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.
मेळघाटातील वातावरण दमट व थंड असल्याने काही भागांमध्ये कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाचे कमी प्रमाणदेखील कारणीभूत आहे.
- अरुण बेठेकर
तालुका कृषी अधिकारी