अमरावतीत प्रथमच आढळला काळा सूरय पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:45 AM2018-05-18T11:45:17+5:302018-05-18T11:45:17+5:30
वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैभव बाबरेकर/अमरावती:
वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे.
सामान्यपणे तलावाच्या काठी ८ ते १० च्या संख्येत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यामध्ये एक वेगळा आणि काळ्या रंगाचा सूरय पक्षी दिसताच त्याचे छायाचित्र काढून ओळख पटवण्याकरिता त्यांनी ते मनोज बिंड आणि राहुल गुप्ता यांना पाठवले. प्रत्यक्ष तलावावर जाऊन सदर पक्षी पांढऱ्या पंखांचा काळा सूरय असल्याची खात्री करून घेण्यात आली. या पक्ष्याचे इंग्रजी नाव 'व्हाइट विंग टर्न' असे आहे.
युरोप, आॅस्ट्रेलिया आणि मध्य आशियात तो आढळून येत असला तरी भारतात तुरळक प्रमाणात हिवाळ्यात स्थलांतर करून येतो. गोड्या पाण्याचे मोठे तलाव, जलाशय आणि समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा तो आढळतो. साधारणपणे २० ते २३ से.मी. लांबीच्या या पक्ष्याची इतर नदी सूरय पक्ष्यांमधून वेगळी ओळख पटवणे एरवी जरा कठीण असले तरी विणीच्या हंगामात शेपटी आणि पंख वगळता हा पक्षी पूर्णपणे काळा रंग धारण करतो. पाय मात्र लालसर असतात. या काळ्या रंगावर त्याचे रूपेरी पांढरे पंख खुलून दिसतात. अन्न मिळविण्याकरिता इतर सूरय पक्ष्यांप्रमाणे हा पाण्यात फारच कमी वेळा सूर मारतो. पाण्यावर समांतर उडून छोटे कीटक आणि लहान मासे अलगद टिपणे हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
यावर्षी मार्च महिन्यात यवतमाळ येथे या पक्ष्याची नोंद घेतली गेल्याने अमरावतीकर पक्षीमित्र, वन्यजीव छायाचित्रकार आणि अभ्यासक यांची उत्सुकता ताणली गेली होती. कडक उन्हामुळे तलावात उपलब्ध पाण्याचे आणि पक्ष्यांच्या खाद्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने असे सहसा आढळून न येणारे पक्षी परतीच्या प्रवासात नियोजित मार्ग सोडून इतरत्र मुक्कामाला थांबत असावे आणि त्यामुळे यावर्षी अशा दुर्मीळ नोंदींचे प्रमाण वाढले असावे, असा निष्कर्ष काढला जात आहे.