वृध्दांच्या व्यथांची जाणीव कुणाला ?
By admin | Published: January 22, 2016 01:27 AM2016-01-22T01:27:33+5:302016-01-22T01:27:33+5:30
वृद्धापकाळी या ना त्या कारणाने जखमी झालेल्या, पाय घसरून पडल्याने हाड मोडलेल्या अनेक महिला जिल्हा सामान्य
वैभव बाबरेकर ल्ल अमरावती
वृद्धापकाळी या ना त्या कारणाने जखमी झालेल्या, पाय घसरून पडल्याने हाड मोडलेल्या अनेक महिला जिल्हा सामान्य रूग्णालयात अनेक दिवसांपासून शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत कण्हत, कुंथत दिवस काढीत आहेत. वॉर्ड क्र. १३ मध्ये सद्यस्थितीत १५ ते २० महिला हाडांच्या दुखण्यावर उपचार घेत आहेत. त्यांच्या मोडक्या हाडांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असताना विविध कारणांनी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेदना सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
गोरगरिब अधिकांश महिला कष्टकरी असतात. कुटुंबासाठी झटताना त्यांना अनेकदा ईजा होते. शारीरिक दुखणे उद्भवते. कधी तरी पडल्याने हाड मोडते. खासगी इस्पितळात जाऊन महागडे औषधोपचार घेण्याची त्यांची परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांचे आप्तेष्ट त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करतात. उपचारांसाठी महिलांकरिता येथे वॉर्ड क्र.१३ आहे. सद्यस्थितीत येथे अनेक विविध दुखण्यांनी ग्रस्त महिला उपचारार्थ दाखल आहेत. त्यांतील अनेकांना शस्त्रक्रियेची गरज आहे. मात्र, येथे त्यांच्या दु:खाला कोणीच वाली असल्याचे दिसत नाही.
जीवनदायी योजनच्या चक्रात अडकल्या शस्त्रक्रिया
४गोरगरीब जनतेसाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. बीपीएल कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, अनेक गोरगरीब नागरिकांकडे आजही राजीव गांधी जीवनदायी योजनेचे कार्ड नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पुरविताना आरोग्य कर्मचारी हयगय करीत असल्याचे चित्र आहे. इर्विनमधील वॉर्ड क्रमांक १३ मधील काही वृध्द महिलांचे उपचार राजीव गांधी जीवनदायी योजनेतून करण्यात येत आहेत. मात्र, संबंधित आरोग्य यंत्रणेला शस्त्रक्रियेचे साहित्य वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक वृध्दांच्या शस्त्रक्रिया रखडल्याचे विदारक चित्रही दिसून आले आहे.
रुग्णांची कागदपत्रे येताच दुसऱ्याच दिवशी ती मुंबई येथील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतात. तेथून मंजुरी मिळताच तत्काळ शस्त्रक्रियेचे साहित्य संबंधित वॉर्डातील प्रमुखांकडे पाठविण्यात येते.
- आशिष इंगोले,
वैद्यकीय समन्वयक.
रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे शस्त्रक्रियेसंदर्भात नियोजन केले जाते. त्यानुसार जुन्या रुग्णांवर आधी शस्त्रक्रिया करण्यात येते, तर नव्याने दाखल रुग्णांवर नंतर शस्त्रक्रिया केली जाते.
- अशोक वनकर,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.