‘त्या’ ११३ पैकी व्यापारी कोण ?

By admin | Published: April 15, 2017 12:03 AM2017-04-15T00:03:59+5:302017-04-15T00:03:59+5:30

तुरीचे शासरकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून व सध्या मार्केट यार्डात असलेल्या शेतकऱ्यांमधील १८० क्विंटलपेक्षा ....

Who is the merchant of 'that' 113? | ‘त्या’ ११३ पैकी व्यापारी कोण ?

‘त्या’ ११३ पैकी व्यापारी कोण ?

Next

१०० क्विंटलवर तुरीची विक्री : शनिवारी यादी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द
अमरावती : तुरीचे शासरकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून व सध्या मार्केट यार्डात असलेल्या शेतकऱ्यांमधील १८० क्विंटलपेक्षा अधिक तूर असणाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी मागितली होती. अशा ११३ शेतकऱ्यांची यादी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. यामध्ये व्यापाऱ्यांची तूर किती, याचा शोध महसूल व पोलीस यंत्रणा समन्वयातून घेणार आहे.
शेतकऱ्यांच्या आडून व्यापाऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने तूर विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची तूर ४ हजार रूपये प्रतीक्विंटल दराने घेऊन ५०५० रूपये प्रतीक्विंटलच्या दराने शासकीय केंद्रावर विकण्याचा प्रकार व्यापारी करीत असल्याच्या तक्रारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याने नाफेड केंद्राद्वारा १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्यांना हुडकून काढण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना दिलेत. तसेच मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या नावावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तूर आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुप्तपणे निगराणी ठेवण्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले.
त्यानुसार महसूल व पोलीस पथकांचा ‘वॉच’ मार्केट यार्डावर आहे. जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी शासकीय तूर खरेदी करणाऱ्या सर्व यंत्रणांकडून केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत १०० क्विंटलवर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली.

२२ नंतर केंद्र सुरू होण्याची शक्यता
अमरावती : यासर्व यंत्रणांनी शनिवारी अशा ११३ शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली. या यादीमधील शेतकरी व शेतकऱ्यांच्या आड व्यापाऱ्यांची पडताळणी आता महसूल व यंत्रणा करणार आहे. यामध्ये तफावत आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील नाफेड/व्हीसीएमएसचे ३, एफसीआयचे २ व डीएमओद्वारा सुरू असलेले ५ शासकीय तूर खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. राज्य शासनाने केंद्राकडे मुदतवाढ मागितली. परंतु अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २२ एप्रिलनंतर केंद्र सुरू होणार असल्याचे माध्यमांना सांगितल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान बाजार समितीद्वारा ज्या शेतकऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत टोकन दिले त्या शेतकऱ्यांची तूर मोजली जाणार असल्याचे अमरावती बाजार समितीचे सचिव भुजंगराव डोईफोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

१०० क्विंटलवर तूर विकणाऱ्यांची संख्या
नाफेडद्वारा मोर्शी केंद्रावर ६ शेतकरी, एफसीआयच्या धामणगावच्या खरेदी केंद्रावर १८, नाफेडच्या चांदूररेल्वे केंद्रावर तीन, धामणगावरेल्वे केंद्रावर १, डीएमओद्वारा तूर खरेदी असणाऱ्या अचलपूर केंद्रावर १०, अंजनगाव सुर्जी ४, चांदूरबाजार १, दर्यापूर येथे ५६ व वरूड केंद्रावर ६ अशा एकूण ११३ शेतकऱ्यांनी १०० क्विंटलवर तुरीची विक्री केली.

अशी होणार पडताळणी
शेतकऱ्यांच्याआड १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध यंत्रणा घेत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारावर चालूवर्षातील पेऱ्याची नोंद, सातबाराचे क्षेत्र व त्याची उत्पादकता, शेतकऱ्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र आदी रेकॉर्डची शहानिशा केली जाणार आहे.

Web Title: Who is the merchant of 'that' 113?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.