जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी?

By admin | Published: November 22, 2014 10:53 PM2014-11-22T22:53:30+5:302014-11-22T22:53:30+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून

Who is the minister in the district? | जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी?

जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी?

Next

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून कोणाची मंत्रीपदी वर्णी लागेल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. हल्ली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असून मंत्रिपदासाठी कोणाचेही नाव जोरकसपणे चर्चिले जात नसल्यामुळे कमालीचे संभ्रम निर्माण झाले आहे.
सुनील देशमुख, अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर व रमेश बुंदिले असे चार आमदार भाजपचे निवडून आले आहेत. परंतु येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यात मंत्रिपद मिळेल की नाही? याबाबत कोणीही आमदार ठामपणे सांगत नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर वेगळे काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट होते. आघाडी शासनाच्या कार्यकाळात काँग्रेसचे चार आमदार असताना अंतर्गत गटबाजीमुळे एकालाही मंत्रिपद मिळविता आले नाही. मात्र भाजपच्या कार्यकाळात तरी जिल्ह्यात मंत्रीपद मिळेल, ही आशा अनेक भाजप कार्यकर्त्यांना होती. परंतु भाजपत ज्या पद्धतीने मंत्रिपदासाठी नाट्यमयरित्या घडामोडी सुरु आहेत, त्या बघता जिल्ह्यात पुन्हा मंत्रिपद नाहीच, असे संकेत मिळत आहेत.
निवडून आलेल्या चारही आमदारांमध्ये एकही आमदार थेट संघ परिवाराशी जुळलेला नाही. अशातच शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चमूत जिल्ह्यातील एकही चेहरा मंत्रीपदी राहणार नाही, असे भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले. सुनील देशमुख निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिले जाईल, असे सुरुवातीला बोलल्या गेले. मात्र, त्यानंतर पाणी कुठे मुरले? हे सुनील देशमुखांच्याही लक्षात आले नाही.
अचानक त्यांचे नाव भाजपच्या वरच्या स्तरावरुनच गायब करण्यात आल्याने देशमुखसुद्धा चक्रावून गेले आहेत. सुनील देशमुखांना यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा असलेला अनुभव बघता त्यांची मंत्रिमंडळात हमखास वर्णी लागेल, असे ठामपणे बोलल्या गेले. परंतु मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हे आरुढ होताच मंत्रिपदाबाबत देशमुखांच्या नावाची चर्चादेखील केली जात नाही, हे वास्तव आहे. जिल्ह्यात दोन विधानपरिषद तर चार विधानसभा सदस्य आहेत. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. परंतु होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या सहा आमदारांपैकी एकाचही नाव वरच्या स्तरावर चर्चिल्या जाऊ नये, ही राजकीयदृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Who is the minister in the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.