एक टक्का लाच कुणाची ? एसीबीकडून शोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:22 AM2018-04-27T01:22:34+5:302018-04-27T01:22:34+5:30
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. कोल्हे याने ती लाच कुणासाठी स्वीकारली हा तपासाचा भाग असला तरी एसीबीकडून एक टक्का कुणाचा? याबाबत सूक्ष्म चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.
सोमवारी दुपारी ४.१० च्या सुमारास बांधकाम कंत्राटदाराकडून वरिष्ठांची स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी १ हजार लाच स्वीकारताना योगेश कोल्हे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. एकूण रकमेच्या एक टक्का लाच म्हणून कोल्हेने २ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ती रक्कम १ हजार रुपये निश्चित झाली. ती स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी, तर बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्याला जामीन मिळाल्याची माहिती एसीबीने दिली.
दरम्यान गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एसीबीचे उपअधीक्षक जयंत राऊत पथकासह महापालिका आयुक्त कार्यालयात दाखल झाले. आयुक्तांच्या सचिव कार्यालयात सीसीटीव्ही लागले आहेत. त्या अनुषंगाने या पथकाने आयुक्तांच्या अॅन्टी चेंबरमध्ये असलेल्या संगणकावर पीए कॅबिनचे एकूणच फुटेज तपासले. बांधकाम कंत्राटदाराकडून लाच घेतानाच संपूर्ण प्रसंग त्या फुटेजमध्ये आहे की कसे ? याची पडताळणी त्यांनी केली. तसेच सोमवारपूर्वीच्या उपलब्ध फुटेजमधून कोल्हेने यापूर्वी कुणाकडून लाच स्वीकारली की काय? याची खातरजमा केल्याचे सांगण्यात आले.
या पथकाने मंगळवारी सायंकाळी तब्बल दोन तास पीएंच्या दालनाची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी कोल्हेसुद्धा त्यांच्यासमवेत होता. गुरुवारी सीसीटीव्ही फुटेज तपासणीवेळी कोल्हे नव्हता. महापालिकेचे कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या उपस्थितीत एसीबीने अॅन्टीचेंबरमध्ये ती सर्व तपासणी पूर्ण केली. याबाबत आयुक्तांनाही विचारणा केली जाईल.
लाचखोरांचे दणाणले धाबे
महापालिकेत वरिष्ठांसह कुठल्या विभागप्रमुखाने त्याच्या स्वाक्षरीचा किती मोबदला ठरवला आहे, हे सर्वश्रूत आहे. महापालिकेशी संबंधित व्यक्ती वा संस्थांना ते सांगण्याची गरज नाही. मात्र, कोल्हे रंगेहाथ पकडला गेल्याने महापाािलकेतील सर्वच लाचखोरांची पाचावर धारण बसली आहे. काही दिवसांसाठी का होईना, कोल्हेंचे प्रकरण शांत होईपर्यंत लाच मागायची नाही आणि स्वीकारायची पण नाही, असा पवित्रा घेण्यात आला आहे.
गेम कुणाचा, फसला दुसराच
संबंधिताला कोल्हेला पकडून द्यायचेच नव्हते. तो सापळा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी रचण्यात आला. मात्र, त्याच्याऐवजी कोल्हे पकडला गेला. अशी प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे. एकूण बिलावर एक टक्का हा अधिकाऱ्याचा असतो. त्यामुळे तो सापळा अन्य अधिकाऱ्यांसाठीच असल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला जात असून, संबंधिताने सजग होण्याची गरज असण्याचा सल्लाही अनाहूतपणे दिला जात आहे. कोल्हे याने ती लाच कुणासाठी स्वीकारली, याची कबुली दिल्याची माहिती आहे. मात्र, त्याला एसीबीकडून दुजोरा मिळाला नाही. महापालिकेतील एका प्रभारी व्यक्तीशी संधान बांधून हा‘ गेमप्लान’ करण्यात आल्याची व्यापक चर्चा आहे.
देशमुखांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी
तत्कालीन उपायुक्त विनायक औगड हे मंत्रालयात परतल्यानंतर त्यांच्या पदाचा तात्पुरता प्रभार पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला. उपायुक्त प्रशासन म्हणून प्रतिनियुक्तीचा अधिकारी न आल्याने किंवा त्यासाठी प्रशासनाकडून व्यापक प्रयत्न करण्यात न आल्याने देशमुख मागील ११ माहिन्यांपासून तो चार्ज सांभाळत आहेत. मात्र, त्यांनी प्रभार स्वीकारताच औगडांच्या काळातील सचिव जितेंद्र भिसडे यांची तत्काळ बदली केली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला. त्यांच्यामते एका नॉन करप्टेड लिपिकाची उपायुक्त कार्यालयात बदली करवून घेतली. कोल्हेच्या लाचखोरीच्या पार्श्वभूमिवर देशमुखांनी त्यावेळी घेतलेला निर्णय आज त्यांच्या दूरदृष्टीचा परिचय करून देणारा ठरला आहे. तथापि आयुक्त हेमंत पवार यांनी सचिव न बदलल्याने त्यांना सोमवारच्या घटनेला सामोरे जावे लागले.