राणा लँड माफिया तर प्रवीण पोटे कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:17 PM2018-11-21T22:17:42+5:302018-11-21T22:18:14+5:30
राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.
अमरावती : राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.
उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी राहू. मात्र, आतापर्यंत त्यांनी काहीही केलेले नाही. नांदगावच्या भारत डायनामिक्स या कारखान्याविषयीच्या बातम्या आज वाचण्यात आल्यात. विजय मिलच्या जागेत उद्योग उभा राहावा, यासाठी २००७ ते आतापर्यंत कोणी प्रयत्न केलेले नाही; आ. राणा यांनी ते सुरू करताच त्यांना विरोध केला जात असल्याचा निषेध कृती समितीने केला. २०१२ ते २०१८ या काळात सातत्याने पाठपुरावा करीत आलो. वस्त्रोद्योग महामंडळाला प्रत्यक्ष भेटलो. येथे उद्योग उभारणीसाठी निविदा काढा, अशी आम्ही मागणी केली. आता अफवा पसरवून धमकावले जात असल्याचा आरोप समितीने केला.
विजय मिलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणीचा आ. राणा यांचा संकल्प आहे. स्थानिक राजकारणी अन् नगरसेवकांचा विरोध आहे. गोरगरिबांची मुले या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळू नये व या ठिकाणी राजकारण आणू नये, असे आवाहन प्राचार्य गोपाल वैराळे यांनी केले. यावेळी सिद्धार्र्थ बनसोड, अजय जयस्वाल, मनोज गजभिये, रामू कातोरे, नितीन सोळंके, विलास वाडेकर, नाना आमले आदी उपस्थित होते.
उद्योग आणून दाखवा; पालकमंत्र्यांना आव्हान
विजय मिलबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याचा एक तरी पुरावा दाखवा. आम्ही कामगार कसे जगत आहोत, याची जाण त्यांना आहे का? नांदगावातील उद्योगाच्या भूमिपूजनासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वाचल्या. उर्वरित सहा महिन्यात मिलच्या जागेवर एक तरी उद्योग आणून दाखवावा, असे आव्हान कृती समितीने दिले.
विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावे
आजही विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावे आहे. आ. रवि राणा यांच्याकडून जमिनीच्या दुरुपयोगाचा शिवराय कुळकर्णी यांनी केलेला आरोप खोटा आहे. आ. राणांच्या चांगल्या कामाची बदनामी व फुकटात प्रसिद्धीचा डाव खेळण्याऐवजी कुळकर्णी यांनी बडनेरासाठी केलेले काम दाखवावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले.