बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी कुणाची?
By admin | Published: November 30, 2015 12:31 AM2015-11-30T00:31:19+5:302015-11-30T00:31:19+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा आपसात समन्वय नसल्याने बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीचा प्रश्न अधांतरी असल्याचे चित्र आहे.
हेळसांड : इर्विन-डफरीन प्रशासनात समन्वयाचा अभाव
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाचा आपसात समन्वय नसल्याने बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीचा प्रश्न अधांतरी असल्याचे चित्र आहे. शनिवारी अंजनगाव सुर्जी येथील एका बलात्कार प्रकरणात महिला पोलिसाने पीडितेला वैद्यकीय तपासणीकरिता अमरावतीला आणले होते. मात्र, दोन्ही रूग्णालयांनी वैद्यकीय तपासणीची जबाबदारी झटकली. कितीतरी वेळ पीडित महिलेच हेळसांड होत राहिली.
अंजनगाव सुर्जी येथे एका ४० वर्षीय महिलेवर तिच्या भाच्याने बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तेथील महिला पोलीस उज्ज्वला खैरकर यांनी शनिवारी सायंकाळी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. मात्र, इर्विन प्रशासनाने पोलिसांना जिल्हा स्त्री रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथेही पोलिसांची बोळवण करण्यात आली. पोलिसांनी महिलेला पुन्हा इर्विनमध्ये आणले. मात्र, येथेही महिलेची तपासणी झाली नाही. दोन्ही शासकीय रूग्णालयांनी ही जबाबदारी नाकारल्याने महिला पोलीस व पीडित महिला चितांग्रस्त झाली होती.
महिला पोलिसाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रविवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन महिला पोलिसाला देण्यात आले.
त्यामुळे पीडितेहसह महिला पोलिसालाही इर्विनमध्येच रात्र काढली. मात्र, सकाळी पुन्हा दोन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय तपासणीबाबत टाळाटाळ केली. या प्रकारामुळे महिला पोलीस रुग्णालय प्रशासनासमोर हतबल झाल्याचे विचित्र चित्र दिसून आले.
वैद्यकीय तपासणीची जबाबदारी दोन्ही शासकीय रुग्णालयांची
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोेपी पुरुषाच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी इर्विन रुग्णालयाकडे आहे तर पीडितांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी डफरीन रुग्णालयावर आहे. मात्र, मध्यतंरी आरोग्य सहसंचालक अर्चना पाटील यांनी वैद्यकीय तपासणीबाबत केलेल्या फेरबदलांची माहिती दोन्ही रुग्णालयांना पत्राद्वारे दिली होती. ज्या रुग्णालयात गायनाकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी वैद्यकीय तपासणी करावी, असे त्यात नमुद होते. मात्र, दोन्ही रुग्णालये ही जबाबदारी नाकारत आहेत.
बलात्कारित महिलांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आहे. तेथे गायनोकॉलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
- अरुण यादव,
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.
डफरीन रुग्णालयात वर्कलोड असल्यामुळे बलात्कार पीडितांना तपासणीसाठी इर्विनमध्ये पाठविले जाते. सध्या पीडितांच्या वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेत गुंता निर्माण झाला आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढू
- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक