अपघातास जबाबदार कोण?
By admin | Published: April 23, 2016 12:04 AM2016-04-23T00:04:46+5:302016-04-23T00:04:46+5:30
एक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण?
रक्तरंजित होळी थांबणार केव्हा ? : बापलेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
नरेंद्र जावरे परतवाडा
एक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण? अशा अपघातानंतर काही तास चालणाऱ्या चर्चेनंतर प्रशासनाचा नाकर्तेपणा नागरिकांना हिंसक वळण घेण्यासह कायदा हातात घेण्यास बाध्य करणारा ठरला. त्यामुळे संतापजनक चित्र जुळ्या शहरात पहावयास मिळाले.
परतवाड्यात अंजनगाव स्टॉप ते जयस्तंभ चौकापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. पुढे जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर अंतिम टप्प्यात आहे. चौपदरीकरणात तयार करण्यात आलेल्या फुटपाटावर लहाण व्यवसायिकंनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना रस्यांवरून चालावे लागत आहे. त्याच रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी वाहणे उभी राहत असल्याने चौपदरीकरणाचा रस्ता एकेरी वाहतूक करणारा ठरला आहे.
वाहतूक विभाग हतबल
शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीन पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. मग अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिकेला पत्र देऊनसुध्दा कुठलीच कार्यवाही होत नाही. वाहक पोलीस विभागात एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मान्य असून केवळ १७ कर्मचारी तैनात आहेत. २० जागा रिक्त आहेत. परतवाडा शहरात मुख्य अपघात स्थळ असलेल्या चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, मिल कॉलनी स्टॉप, बसस्थानक, जयस्तंभ चौक, लालपूल, अंजनगाव स्टॉप, चिखलदरा स्टॉप, बैतुल स्टॉप, दुर्राणी चौक, गुजरी बाजार आदि ठिकाणीसुध्दा कर्मचारी नसल्याने वाहतूक विभागावर नामुस्की ओढवली आहे.जुळया शहरात अंदाजे तीन चाकी आॅटोंची संख्या दोन हजारांवर आहे. शहरातील महामार्गावर वाट्टेल तिथे थांबण्यासह, मधात उभे करणे, चालताना मागून वाहन येत असल्याची पर्वा न करता आॅटो पलटविण्याचा पराक्रम सुरू आहे.
गतिरोधक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित
रस्ता चौपदरीकरणानंतर वाढते अपघात पाहता, वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जयस्तंभ चौक, अंजनगाव, चिखलदरा, बैतूल स्टॉप, आठवडी बाजार, बसस्थानक आदि महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याचे पत्र दिले. तर नियमानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे ते पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांना समितीतर्फे मान्यता दिल्यावर गतीरोधक तयार करण्यात येतील. भाग तो पर्यत किती जणांचा नाहक बळी जाईल हे सांगणे कठीण आहे.
अतिक्रमणाविषयी पालिका उदासीन
शहरात अपघाताची मालीका सुरु असतांना अचलपूर नगर पालीका भाग हा रक्तरंजीत खेळ, तमाशा म्हणून बघीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेले अतीक्रमण काढण्याचे पत्र, त्यामुळे वाहतूकीची कोंडी होवून अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने लेखी कळविले आहे. परंतु पालिकेत मुख्याधिकारी चार दिवसांपासून विनापरवानगी कुठे गेले याचा शोध नगराध्यक्षांना घ्यावा लागत आहे. सदर पत्राबाबत नगराध्यक्ष रंगालाल नंदवंशी यांच्याशी विचारणी केली असता त्यांनी हा खुलासा केला. मुख्याधिकारी धनंजय जावळीकरांच्या दुर्लक्षामुळे विकसकामे रखडल्याचा आरोप होत आहे.
रिंंगरोड आवश्यक
परतवाडा शहराबाहेरुन जड वाहनांसाठी मंजूर असलेला प्रस्तावित रिंंंगरोड अपघात टाळण्यासाठी आवश्यक झाले आहे. चांदूर बाजार नाका ते कविठा माग्र्ेि बैतूल, धारणी मार्गाला हा रिंंगरोड जोडण्याचा जुना प्रस्ताव आहे. परतवाडा शहरातून इंदूर, अकोला, बैतूल, राज्य व आंतराज्यीय वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
बापलेकांवर अंत्यसंस्कार
गुरुवारी मृत दादाराव पंधरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथे दुपारी १.२० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनचे शवविच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार केल्यावर त्याचा मृतदेह परिजनांना १०.३० वाजता देण्यात आला. दादाराव पंधरे यांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.
आज वाहतुकीवर बैठक
शहरातील वाढते अपघात, अनियंत्रित वाहतूक, अतिक्रमण आणि सर्व विषयावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस स्टेशनला महत्त्वाची बैठक घेण्यात आली. व्यवसायी, अधिकारी, पत्रकार व संबंधित विभागाला बोलविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.