डॉक्टर नाही तपासणार तर कोण? प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर 'इर्विन'चा ताण
By उज्वल भालेकर | Published: May 17, 2023 05:46 PM2023-05-17T17:46:46+5:302023-05-17T17:47:10+5:30
Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीच्या वेळेत काही डॉक्टर हजरच राहत नसल्याची ओरड रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहे.
उज्वल भालेकर
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीच्या वेळेत काही डॉक्टर हजरच राहत नसल्याची ओरड रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हेच ओपीडीत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सेवा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बाह्यरुग्ण तपासणी विभाग (ओपीडी)ची वेळ ही सकाळी ८:३० ते दुपारी २ पर्यंतची आहे. त्यामुळे या वेळेत डॉक्टरांनी ओपीडीमध्ये हजर राहून बाह्यरुग्णांना आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे; परंतु, काही ओपीडीमध्ये डॉक्टर हे सकाळी ९:३० वाजताच्या नंतरच हजर होतात. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. यानंतर डॉक्टर आल्यानंतर किमान ओपीडी बंद होण्याच्या वेळेपर्यंत तरी त्यांनी आपली प्रामाणिक सेवा देणे गरजेचे आहे; परंतु, दुपारी १२:३० पर्यंत डॉक्टर निघून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातून लांबचा प्रवास करून आलेल्या रुग्णांना ओपीडी बंद झाल्याचे कारण सांगत दुसऱ्या दिवशी बोलविले जाते किंवा ओपीडीमध्ये हजर असलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून तपासणी करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
डॉक्टरांची अनेक पदे रिक्त
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वर्ग एक व वर्ग दोनच्या डॉक्टरांची अनेक पदे हे रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित डॉक्टरांवरील कामांचा ताण वाढला आहे. तसेच काही डॉक्टरांची बदली झाल्यानेही पदे रिक्त आहेत. त्यामुळे याचा परिणाम हा रुग्णालयातील ओपीडीमध्येही दिसून येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडू सांगण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवरच इर्विनचा डोलारा
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विविध महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी अभ्यासक्रमाचाच एक भाग असल्याने इर्विन रुग्णालयात प्रशिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते; परंतु, रुग्णांच्या संख्येत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने या विद्यार्थांनाच रुग्णालयातील बहुतांश रुग्ण तपासावे लागत आहे.
ओपीडीचा वेळ हा सकाळी ८:३० ते दुपारी २ वाजेपर्यंतचा आहे. सध्या रुग्णालयातील काही डॉक्टरांच्या बदल्या झाल्याने काही पदे ही रिक्त झाली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात त्याचा परिणाम हा ओपीडीवर दिसून येत आहे. तसेच काही डॉक्टर हे शस्त्रक्रिया विभाग तसेच अपघात कक्षातील रुग्णांना सेवा देण्यासाठीही जातात.
- डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन