अन्न सुरक्षा करणार कोण? जिल्ह्यात एकमेव अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 11:15 PM2024-02-10T23:15:29+5:302024-02-10T23:17:46+5:30
अमरावती विभागातही शुकशुकाट : सहआयुक्त, सहायक आयुक्तपद रिक्त, नागपूरकडे प्रभार
मनीष तसरे
अमरावती : जिल्ह्यातील परवानाधारक स्टॉल व हॉटेल यांच्याकडून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या अन्न व औषधी प्रशासन कार्यालयात एकमेव अधिकारी कार्यरत आहेत. अमरावती विभागीय कार्यालयात तर शुकशुकाट आहे. पाच जिल्ह्यांचा कारभार पाहणारे सहआयुक्त आणि सहायक आयुक्त ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी एकच, तर औषध निरीक्षकसुद्धा एकमेव आहे.
अमरावती येथील कार्यालयाला मागील दोन महिन्यांआधी सहआयुक्त या पदावरील अधिकारी निवृत्त झाले. त्यांचा पदभार हा नागपूरला देण्यात आला, तर सहायक आयुक्त या पदावरील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा प्रभार हा अकोला येथे देण्यात आला. त्यांच्याकडे वाशिम, अकोला, अमरावती येथील कामकाजाचा बोझा आहे.
जिल्ह्यात १२ हजार व्यावसायिक
जिल्हा आणि शहरात जवळपास १२ हजार परवानाधारक व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थ तपासणीची जबाबदारी ही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची असते; मात्र एकमेव अधिकारी मंत्र्यांचे दौरे, मान्यवरांच्या भेटी, कार्यालयीन कामकाज, न्यायालयीन कामकाज सांभाळून वर्षभरात किती आस्थापनांची स्वत: पुढाकार घेऊन तपासणी करीत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. विशेष म्हणजे, अमरावती येथे सहा पदे मंजूर आहेत.