नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:47 PM2024-11-25T12:47:27+5:302024-11-25T12:49:30+5:30
Amravati Vidhan Sabha Election 2024 Results : रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड यांची नावे स्पर्धेत; महायुती सरकारात भागीदारीचे दाट संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात महायुतीला २३६ जागांवर विजय मिळविला असून, जनतेने बहुमत दिले आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यातून आठपैकी सात जागांवर महायुती जिंकली आहे. त्यामुळे महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते? याकडे नजरा लागल्या आहेत. रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड या नवनिर्वाचित आमदारांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
यंदा जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार निवडून आले आहेत. यात अमरावती सुलभा खोडके, बडनेरा स्वी राणा, अचलपूर प्रवीण तायडे, तिवसा राजेश वानखडे, मोर्शीत चंदू यावलकर, धामणगाव प्रताप अडसड, तर मेळघाटातून केवलराम काळे यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे दर्यापुरातून गजानन लवटे हे एकमात्र निवडून आले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात भाजपने मोठी मुसंडी मारली असून, पाच जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पार्टीने प्रत्येकी एका जागेवर विजय संपादन केला आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये विभागाचे केंद्र असलेल्या अमरावतीच्या वाट्याला मंत्रिपद मिळेल, अशी भाजपच्या गोटात जोरदार चर्चा आहे. सोमवारनंतर ते चित्र स्पष्ट होईल.
मंत्री म्हणून कोण घेणार शपथ?
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात अमरावतीला स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा, तर भाजपचे आमदार प्रताप अडसड या तिघांपैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. यात बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आहेत. राणा यांनी विजयाचा चौकार लगावून विरोधकांना गारद केले आहे. अमरावतीतून सुलभा खोडके व प्रताप अडसड यांनी धामणगावातून दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. अडसड हे संघ परिवारातून असल्यामुळे त्यांनादेखील मंत्रिपद मिळू शकते. सुलभा खोडके यांचे यजमान संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून, अजित पवार यांचे ते कौटुंबीक सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून सुलभा खोडके यांच्याही नावाचा मंत्रिपदासाठी विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीतून मंत्रिपदासाठी कोणाचे नाव फायनल होते आणि मंत्री म्हणून कोण शपथ घेणार? हे येत्या काही दिवसात निश्चित होणार आहे.
अमरावतीत मंत्रिपद भाजप की मित्रपक्षाला?
नवनिर्वाचित भाजप आमदारांवर राणा दाम्पत्यांची छाप आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी अचलपूरचे प्रवीण तायडे, तिवस्यातून राजेश वानखडे, मेळघाटचे केवलराम काळे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. सभा, बैठका, रॅलीद्वारे त्यांना निवडून आणण्यासाठी जोरकस प्रयत्न केले. आमदार रवी राणा वांनीसुद्धा त्यांच्या विजयासाठी 'फिल्डिंग लावली. मोर्शीचे चंद्र यावलकर, धामणगावचे प्रताप अडसड यांचीदेखील राणांशी सलगी आहे. एकंदरीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची छाप असून रवी राणा यांना मंत्रिपद मिळण्याची मोठी खात्री आहे