अमरावती विद्यापीठात कुलसचिवपदाची धुरा कोण सांभाळणार? कुलगुरूंसमोर पेच
By गणेश वासनिक | Published: May 16, 2024 09:42 PM2024-05-16T21:42:02+5:302024-05-16T21:42:26+5:30
कार्यभार देण्यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध सुरू
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचा कार्यकाळ येत्या १९ मे रोजी पूर्ण होत असून त्यांचा कार्यभार कुणाला द्यावा, यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध कुलगुरूंनी सुरू केला आहे. गत पाच वर्षात विद्यापीठाची दुरवस्था, प्राधिकारणीसमोर उठलेले विविध प्रश्न, नॅकचा घसरलेला दर्जा, अधिसभा निवडणुकीत अनुभवहीन अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे निर्माण झालेली न्यायालयीन प्रकरणे, माजी रासेयो संचालकांचे गाजलेले अग्रीम प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पात्र अधिकारी /प्राध्यापकास कुलगुरूंनी स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानापन्न नियुक्ती म्हणजे काय?
कुलसचिवांचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीकरिता चार्ज दिला जातो तेव्हा तो पूर्णकालीन कार्यभार गणला जातो आणि कुलसचिवपदाच्या वेतनाकरिताही ग्राह्य मानण्यात येतो. स्थानापन्न नियुक्ती ही पूर्णवेळ नियुक्ती गणली जात असल्याने व नियमित वेतनश्रेणी अंतर्गत येत असल्याने ही नियुक्ती देताना नियमानुसार कुलसचिवपदासाठी पात्र व्यक्तीलाच स्थानापन्न नियुक्ती देणे गरजेचे असते.
कोण आहे पात्रताधारक?
स्थानापन्न कुलसचिवांचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सध्या कार्यरत एकही उपकुलसचिव पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाहीत. विद्यापीठात उपकुलसचिवांपैकी डॉ. सुलभा पाटील व डॉ. दादाराव चव्हाण हे पीएच. डी. आहेत. परंतु अनुभवाची अट पूर्ण करीत नाहीत तर मीनल मालधुरे व मोनाली तोटे यांच्यासह ऋतुराज दशमुखे, मंगेश वरखेडे, विक्रांत मालविय, मंगेश जायले हे अधिकारी पीएच. डी. नाहीत. विद्यमान वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, डॉ. मो. अतिक, डॉ. अविनाश असनारे व डॉ. प्रशांत गावंडे हे पात्रतेच्या अटी पूर्ण करतात; परंतु ते अर्जदार आहेत. अनुभवाचा विचार करता डॉ. एस. व्ही. डुडूल, डॉ. मोना चिमोटे, डॉ. डी. वाय. चाचरकर अथवा डॉ. अनिता पाटील यापैकी कोणाकडे स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार जातो, हे बघावे लागेल.
डॉ. तुषार देशमुखांना नारळ कधी?
कुलसचिव डॉ. तुषार देशमुखांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी १९ मे रोजी पूर्ण होत आहे. कुलसचिवांना रविवार ऐवजी शनिवारी कार्यमुक्त करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे तर रविवारी कार्यमुक्त करण्यासाठी देशमुख आग्रही असल्याचे समजते. अनेकांना दरमहा नारळ देणाऱ्या कुलसचिवांना नियमबद्ध प्रशासन कधी नारळ देणार, याची चर्चा विद्यापीठात रंगली आहे.