धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपणार कोण ?
By admin | Published: March 29, 2016 12:04 AM2016-03-29T00:04:31+5:302016-03-29T00:04:31+5:30
काकडा-अंजनगाव सुर्जी मार्गावर आठ किलोमीटर अंतरावरील वडनेर भूजंग हे महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
वडनेर भूजंग येथील घटना : आश्रमातील अत्याचार प्रकरण
अंजनगाव सुर्जी : काकडा-अंजनगाव सुर्जी मार्गावर आठ किलोमीटर अंतरावरील वडनेर भूजंग हे महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. ८०० वर्षांपूर्वी येथील श्रीदत्त मंदिरात श्री चक्रधर स्वामी मुक्कामी थांबले आणि त्यांनी सर्पांचे भांडण मिटविल्याची कथा ‘लीळाचरित्र’ या ग्रंथात आहे. यामुळे येथे वर्षभर अनुयायांची वर्दळ असते. अशा पवित्रस्थळी जर एखाद्या महिलेचा उपमर्द होत असेल तर हे जपणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मानसिक रोगी व भ्रमिष्ट व्यक्तीच्या व्याधी येथील वास्तव्याने नष्ट होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे अनेकजण येतात. पण, तीर्थस्थळाचा कोणताच दर्जा मिळालेला नसल्याने येथे शासनामार्फत बांधलेली कोणतीच वास्तू नाही. पंथांच्या मुनी-महंतांचे देवदत्त आश्रम, चक्रपाणी आश्रम, आनंदेश्वर आश्रम व इतर लहान-मोठे आश्रम आहेत. तेथेच भक्तांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.
मागील बुधवारी येथील देवदत्त आश्रमात महिलेवरील अत्याचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले. आश्रमप्रमुख दिगंबर मुनींच्या एका नातलगाने येथीलच एका निवासी मुलीवर महिनाभर केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तक्रार पथ्रोट पोलिसांना मिळताच लंपट भक्ताला बेड्या ठोकल्या व भादंवि ३७६ चा गुन्हा दाखल केला. इतक्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाशेजारील आश्रमात महिलेची अशी विटंबना आणि बदनामीकारक प्रकरण होऊनही पंथाच्या कुण्याच मुनी-महंताने अथवा पदाधिकाऱ्याने पुढे येऊन या घटनेचा निषेध केला नाही. गेल्या बुधवारपासून या घटनेबाबत कुठेही वाच्यता झाली नाही. परिणामी येथील महिला भक्तांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पाच वर्षांपूर्वी येथील आश्रमातील निवासी भक्त महिलेस एकाने पळवून नेले होते. त्याला बुलडाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण, बदनामीपोटी महिलेच्या कुटुंबाने महिला हरविल्याची तक्रार पथ्रोट ठाण्यात दाखल केली होती. आश्रमात गुन्हेगारी तत्त्वांना थारा न देणे आणि येथील महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणे, ही येथील प्रमुखांची जबाबदारी आहे. जेणेकरून या मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील. घटनेचा निषेध करण्यासाठी मौन सोडून पुढे येणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)