बच्चू कडूंची पंचवार्षिक कोण आमदारकी रोखणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:45 AM2024-07-24T11:45:38+5:302024-07-24T11:47:47+5:30
Amravati : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपकडून रणनीती; ठाकरे सेनेचे 'वेट ॲन्ड वॉच'
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्राचीन शहर आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे शहर असून, पुरातन वास्तू याची साक्ष देतात. अचलपूर शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले, तर सध्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रहारचे ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे आहेत. सलग चारदा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा बच्चू कडू हे रिंगणात असतील, यात दुमत नाही. त्यामुळे बच्चू कडूंची पंचवार्षिक आमदारकी कोण रोखणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचे दिनेश बूब यांना ८५,३०० मते मिळाली. मात्र, आ. कडू यांचे गृहक्षेत्र असलेल्या अचलपूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी ६,७९३ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे आमदार कडू यांना विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी घेरण्याची तयारी चालविली. 'अभी नही तो कभी नही' असा चंग भाजप, काँग्रेसने बांधला आहे. त्यानुसार आ. बच्चू कडू यांच्यावर टीका व राजकीयदृष्ट्या त्यांची बदनामी करण्याची कोणतीही संधी इच्छुक उमेदवार सोडत नाहीत. बच्चू कडू हे विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरात एक आगळा-वेगळा सोशल चेहरा आहे. दिव्यांगांचे बळ, रुग्णसेवा, सामाजिक कर्तव्याची जाण आणि सहजतेने उपलब्ध होणारा आमदार अशी त्यांची अचलपूर मतदारसंघात ख्याती आहे. असे असले तरी चारवेळा आमदार असलेले बच्चू कडू यांच्याबाबत 'अॅन्टी इन्कमबन्सी' भरपूर आहे. नेमकी तीच 'कॅश' करण्यासाठी व्यूहरचना विरोधकांनी चालविली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, साजीक फुलारी, तर महायुतीतून भाजपचे नंदू वासनकर, प्रवीण तायडे, सुधीर रसे हे तिकिटाच्या स्पर्धेत आहेत, तर वंचित बहुजन आघाडी, रिपाइं, मनसेकडूनही अचलपुरात उमेदवारी दिली जाईल, अशी राजकीय जाणकारांची माहिती आहे. ठाकरे सेनेकडून उमेदवार कोण? याबाबत निर्णय गुलदस्त्यात आहे. एकंदरीत येत्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू विरुद्ध 'ऑल पॉलिटिकल पार्टी' असे अचलपूर मतदारसंघात चित्र रंगले, तर नवल वाटू नये, असे संकेत आहेत.
अचलपूर मतदारसंघाचे १९६२ ते २०२४ पर्यंत आमदार
- १९६२ अण्णासाहेब वाटेणे (अपक्ष)
- १९६७ नरसिंग देशमुख (काँग्रेस)
- १९७८ वामनराव कोरडे (अपक्ष)
- १९८० व १९८५ सुदामकाका देशमुख (अपक्ष, सीपीएम)
- १९९० व १९९५ विनायक कोरडे (भाजप)
- १९९९ वसुधा देशमुख (काँग्रेस)
- २००४ ते २०१९ बच्चू कडू (अपक्ष, प्रहार)
दर्यापूर मतदार संख्या - २,५३,३१८
स्त्री - १,१९,१६३
पुरुष - १,३४,१५४
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालावर एक नजर...
बच्चू कडू (प्रहार) : ८१,२५२
बबलू देशमुख (काँग्रेस) : ७२,८५६