मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:01:17+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशात अमरावतीवरून अपडाऊन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने येथे सर्वसामान्यांना एंट्री बंद करण्यात आली आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी करीत हा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच अद्यापही अप-डाऊन करतात. मुख्यालयी न राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार तरी कोण, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच बहुतांश नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशात अमरावतीवरून अपडाऊन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी महिला कर्मचाऱ्याच्या अमरावती येथील राहत्या घराशेजारील व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळल्याने या रुग्णाच्या संसगार्मुळे सदर कर्मचारीसुद्धा पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. तसेच या महिला कर्मचाऱ्याच्या घरातील काही व्यक्तीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे स्थानिक तहसील कार्यालयात खबरदारी म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार पहिल्यांदाच नागरिकांसाठी बंद करण्याची वेळ आली. कार्यालयातील सदर महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण कार्यालयातील तसेच कृषी विभागातील कर्मचाºयांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. तरीदेखील मुख्यालयी न राहता अमरावती शहरातून शेकडो कर्मचारी दररोज तालुक्यात कर्तव्य बजावण्यासाठी येतात. यात शासकीय कर्मचारी, बँक, शाळा-महाविद्यालयांचे कर्मचारीदेखील आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षक व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालायी राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र चांदूर रेल्वे, राजूराबाजार व चांदूरबाजार येथील कोरोना बाधितांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊनच कारणीभूत ठरल्याचे वास्तव आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष आहे.
कारवाई कागदावरच
मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मुख्यालयाचे बंधन टाकावे, अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे. अप-डाऊन करून सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप ती कागदावरच आहे.
रॅपिड टेस्टचा अहवाल निगेटिव्ह
चांदुर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी ४७ कर्मचाऱ्यांचे रॅपिड टेस्ट नमुने घेण्यात आले. यात सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. ४ कर्मचाऱ्यांच थ्रोट स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन सुचविण्यात आले आहे. स्थानिक तहसील कार्यालयातील चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी अमरावती येथिल राहत्या घरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानुसार सोमवारी कार्यालयात उपस्थित असल्याने सदर कर्मचारी संपर्कात आली असल्याचा संशयावरून खबरदारी म्हणून तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तलाठी यांची रॅपिड चाचणी घेण्यात आली. कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत पत्र पाठवून सूचना देण्यात येत आहेत.
- अभिजित जगताप, तहसीलदार, चांदूरबाजार.