तुम्ही कुणाला मत दिले ते सात सेकंदात दिसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:44 PM2018-12-21T22:44:45+5:302018-12-21T22:45:00+5:30
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (मतदान यंत्र) सोबत व्हीव्हीपॅट (मतदान झाल्याचे दर्शविणारी चिठ्ठी) चा वापर होणार आहे. यामुळे मतदान यंत्राबाबत शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून ‘जनविश्वास अभियान’ या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सर्व मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिके दाखविण्याकरिता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम तयार करण्यात आ आहे. जनविश्वास अभियान अंतर्गत तालुकानिहाय पथकांची निवड केली आहे. एकूण १५ पथके यासाठी आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचारी राहतील. सोबतच या यंत्राच्या सुरक्षेकरिता पोलीस कर्मचारीही राहणार आहे. सदर पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाद्वारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार करतील. सोबतच मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (मॉक पोल) करून घेतील. याकरिता १५ वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राहतील, असे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.
सदर अभियान सर्व विधानसभा मतदारसंघांतील गावांमध्ये मतदार केंद्रे तसेच आठवडी बाजार, शहरातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय आदी मोक्याच्या ठिकाणी राबविले जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार नीता लबडे उपस्थित होत्या.
-तरच पुन्हा मतमोजणी
आपण कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीद्वारे दिसेल. ती चिठ्ठी त्याच सीलबंद पेटीत पडेल. दरम्यान, कमी मतफरकाने उमेदवार विजयी होत असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराने पुन्हा मतमोजणीची लेखी स्वरूपात मागणी केली, तरच निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.