गेला ‘मंगेश’ कुणीकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:10 AM2021-01-10T04:10:14+5:302021-01-10T04:10:14+5:30
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरप्रकार उघड झाल्यानंतर भरतिप्रक्रिया राबविणाऱ्या वादग्रस्त केएनके कंपनी व ...
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गतवर्षी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरप्रकार उघड झाल्यानंतर भरतिप्रक्रिया राबविणाऱ्या वादग्रस्त केएनके कंपनी व बाजार समितीच्या उर्वरित संचालकांचे बयान पोलिसांनी नोंदविले. मात्र, गुन्हा दाखल झालेले तीनही आरोपी २१ दिवसानंतरसुद्धा पोलिसांना गवसले नाहीत. दुसरीकडे आरोपी महिला कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अचलपूर न्यायालयाने फेटाळल्यानंतर उर्वरित दोन आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर १४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आरोपी सहायक सचिव मंगेश भेटाळू सापडत नसल्याने पालिका व पोलीस वर्तुळात ‘गेला मंगेश कुणीकडे?’ असा सूर आवळला जात आहे.
संपूर्ण जिल्हा व सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या नवीन कर्मचारी सरळ सेवा भरती प्रकरणात गतवर्षी सहायक सचिव मंगेश भेटाळू याने शिपाई शैलेश शुक्ला याच्याशी संगनमत करून उमेदवार लता वाजपेयी हिच्या ऑनलाइन अर्जासोबतचे परीक्षा शुल्क मुदतीनंतर भरणा केला. चौकशीत गैरप्रकार उघडकीस येताच बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांत फिर्याद दिली. परतवाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये २१ डिसेंबर रोजी गुन्हे नोंदविले होते. गुन्हा दाखल होण्याआधीपासून तिन्ही आरोपी पसार आहेत.
केएनकेच्या संचालकांचे बयान नोंदविले
परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतरच सदर तपास पुन्हा अचलपूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणेदार सदानंद वानखडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कर्मचारी भरतिप्रक्रिया राबविणाऱ्या केएनके कंपनीच्या संचालकांचे व बाजार समितीच्या उर्वरित काही संचालकांचे बयान नोंदविले. संपूर्ण प्रकरणात अजून कुणावर गुन्हा दाखल होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बॉक्स
प्रक्रियाच वादग्रस्त
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण १२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. ही संपूर्ण भरतिप्रक्रिया वादग्रस्त असून, ती रद्द करण्याची मागणी एका महिला संचालकाने पत्राद्वारे केली आहे. या भरतिप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात होत आहे. त्याचासुद्धा तपास पोलिसांनी करण्याची मागणी होत आहे.