कौल कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:39 PM2018-05-23T22:39:11+5:302018-05-23T22:39:24+5:30
विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. अवघ्या तासाभरात लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांची उत्सुकता फारसी ताणली जाणार नाही. यावेळी दोनच उमेदवार रिंगणात असल्याने ‘सिंगल ट्रान्सफरेबल वोट’ सारख्या क्लिष्ट मतमोजणी प्रक्रियेला फाटा मिळणार आहे.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. अवघ्या तासाभरात लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांची उत्सुकता फारसी ताणली जाणार नाही. यावेळी दोनच उमेदवार रिंगणात असल्याने ‘सिंगल ट्रान्सफरेबल वोट’ सारख्या क्लिष्ट मतमोजणी प्रक्रियेला फाटा मिळणार आहे.
येथील नियोजन भवनात निवडणूक विभागाने स्ट्राँगरूम बनविली आहे. तेथून सकाळी ८ वाजता सर्व मतपेट्या सभागृहात आणल्या जातील. या ठिकाणी दोन टेबल राहणार आहेत. या सर्व मतपत्रिका प्लायवूडच्या हौदात एकत्रित करून सरमिसळ केली जाणार आहे. जेणे करून कोणत्या केंद्रावरील मतपत्रिका आहे, हे कोणालाच कळणार नाही व मतदाराची गोपनियता कायम राहील, हा या प्रक्रियेमागचा उद्देश आहे. यासर्व मतपत्रिका पहिल्या क्रमांकाच्या टेबलवर प्रत्येकी २५ च्या गठ्ठ्यामध्ये बांधल्या जातील. यावेळी अवैध ठरलेली व नोटाला मतदान झालेल्या मतपत्रिका वेगळ्या काढल्या जातील. त्यामुळेच एकूण वैध मते भागीला दोन अधिक एक या सूत्राने विजयी मताचा कोठा ठरणार आहे. या विजयी मतांच्या एक षष्टांश मते डिपॉझिट वाचविण्यासाठी लागणार आहे.
प्रत्येकी २५ मतपत्रिकेचे गठ्ठे हे दुसऱ्या टेबलवर मोजणीसाठी आणल्या जाणार आहे. या दोन्ही टेबलवर प्रत्येकी एक उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी अधीक्षक व एक तहसीलदार व एक नायब तहसीलदार, असे सहा अधिकाºयांचे दोन पथक राहणार आहे. यापैकी एक पथक मतमोजणी करणार असल्याची माहीती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.
पोटे डेली रुटीनमध्ये बिझी, गुरूवारी शेगावला
मंगळवारपासून आपण नियमित जे रूटीन आहे तेच काम केले. कार्यकर्त्यांशी चर्चा, येणाºया नागरिकांच्या कामाविषयी चर्चा तसेच भेटायला अलेल्या मतदारांचे आभार यामध्येच व्यस्त असल्याचे प्रवीण पोटे यांनी सांगितले. बुधवारीदेखील हीच प्रक्रिया राहिली, निश्चित व मोठ्या फरकाने विजयी होऊ, गुरुवारी शेगावला जाऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
माधोगडियांनी घेतले
अंबादेवी, बालाजीचे दर्शन
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल माधोगडिया यांनी मतदानानंतर मंगळवारी अंबा व एकवीरादेवी तसेच बालाजीचे दर्शन घेतले. शहरात व ग्रामीणमध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे व मतदारांचे आभार मानून चर्चा केली. बुधवारीदेखील हाच दिनक्रम राहिला असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. गुरूवारी जो निकाल येईल तो मतदारांचा कौल मानून आपण स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.
माधोगडियांद्वारा आचारसंहितेचे उल्लंघन
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शहर काँग्रेस कमिटीद्वारा आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगडिया यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. वास्तविकता या निवडणुकीची आचारसंहिता गुरूवारी निकाल जाहीर होईपर्यंत राहणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा हा प्रकार आहे. यावर जिल्हा प्रशासनाने चुप्पी साधली.
सिंगल ट्रांन्सफरेबल वोट ही प्रक्रिया राहणार नसली तरी निकाल कधी हाती येतील, यावर भाष्य करू शकणार नाही. एका उमेदवाराने बुधवारच्या आंदोलनात सहभाग घेतला. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असे म्हणता येणार नाही. मतदानाची प्रक्रिया आता आटोपली आहे.
- शरद पाटील,
उपजिल्हाधिकारी (निवडणूक)