गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

By गणेश वासनिक | Published: April 16, 2024 09:12 AM2024-04-16T09:12:28+5:302024-04-16T09:13:53+5:30

भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. 

Whose math will be spoiled BJP and Congress candidates are worried, the picture will change after the meeting of the leaders | गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती
: देशाचे पहिले कृषिमंत्री डाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला अमरावती मतदारसंघ हा देशभरात सतत चर्चेत राहिला. यंदा भाजप पहिल्यांदाच  या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसने २८ वर्षांनंतर उमेदवार रिंगणात उतरविला आहे. भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. 

या मतदारसंघात यंदा ३७ उमेदवार रिंगणात आहेत. २०१९ ची निवडणूक वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अमरावतीची ओळख होती. मात्र हल्ली शिवसेना गटातटात विभागली गेली आहे. खासदार नवनीत राणा या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु, काहीच महिन्यात राणांनी केंद्र सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला हाेता. 

त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  असलेले आनंदराज आंबेडकर  यांची रिपब्लिकन सेनेकडून ‘वंचित’च्या पाठिंब्याने उमेदवारी कायम आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे.  आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटल्याचे दिसून येते. एकंदरीत प्रहार, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार किती मते घेतात? यावर प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरेल. बसपाचे ॲड.  संजयकुमार गाडगे हे सुद्धा रिंगणात आहेत.

पहिल्यांदाच भाजप अन्‌ २८ वर्षांनंतर काँग्रेस
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती राखीव जागेसाठी आहे. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने स्वतंत्रपणे ‘कमळ’वर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. तर तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेस ‘पंजा’ घेऊन मैदानात उतरली आहे. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या, हे विशेष. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. पदयात्रा, रॅली, कॉर्नर बैठका, थेट भेटीगाठींवर भर दिला जात आहे.  मात्र राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांनंतर चित्र पालटण्याचे संकेत आहे.

गटातटाचा काय होणार परिणाम? 
- नवनीत राणा यांनी भाजपची उमेदवारी आणून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपचे निष्ठावंत आणि काही स्थानिक नेते अद्यापही या धक्क्यातून सावरले नाहीत. राणांसोबत प्रचाराला फिरत असले तरी त्यांच्या मनात वेगळेच आहे. 
- प्रहारचे दिनेश बुब, रिपब्लिकन सेेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. आमदार सुलभा खोडके या काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत.

एकूण मतदार    १८,३६,०७८ 
पुरुष - ९,४४,२१३
महिला - ८,९१,७८०
  
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- जिल्ह्यात उद्योगधंद्याचा अभाव आहे. अमरावतीत पंचतारांकित एमआयडीसी असूनही येथे एकही मोठा प्रकल्प नाही. बेलोरा विमानतळाचे भिजत घोंगडे कायम आहे. विमानांच्या टेकऑफची प्रतीक्षा आहे. 
- संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी त्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. प्रत्येक लाेकसभा निवडणुकीत संत्रा प्रक्रिया आणि शेतकरी प्रश्नांवर राजकारण केले जाते. 
- बेरोजगारी समस्या असून, उच्चशिक्षितांना नोकरी नाही. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात हाेत असल्याची नाेंद आहे.

२०१९ मध्ये काय घडले?
नवनीत रवी राणा    अपक्ष (विजयी)    ५,१०,९४७
आनंदराव अडसूळ    शिवसेना    ४,७३,९९६
गुणवंत देवपारे    वंचित बहुजन आघाडी    ६५,१३५
नोटा    -    ५, १८२ 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी? 
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के

२०१४    आनंदराव अडसूळ     शिवसेना        ४,६५,३६३    ४६%
२००९    आनंदराव अडसूळ    शिवसेना        ३,१४,२८६    ४३%
२००४    अनंत गुढे    शिवसेना    २,३२,०१६    ३३%
१९९८    रा.सू. गवई    रिपाईं        २,३६,४३२    ३४%
१९९६    अनंत गुढे    शिवसेना        २, १२,९८६    ४२%

Web Title: Whose math will be spoiled BJP and Congress candidates are worried, the picture will change after the meeting of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.