भुजबळांना तुरुंगात डांबले अजित पवारांना का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:30 PM2019-04-01T23:30:27+5:302019-04-01T23:30:48+5:30
राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ खासदार ओवैसी यांची येथे जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. भाजप-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सर्व पक्षांचा एक क्लब असून, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्ही गरीब, सामान्य, शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी आता वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र क्लब बनवित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अजित पवार यांना सिंचन प्रकल्पाच्या घोटाळ्यातून पुरेपूर वाचवण्यात आले. त्याऐवजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. हैद्राबादी म्हणीनुसार ‘चोरा चोरा करके गावां बाट लिया’ असे भाजप आणि शरद पवार यांचे राजकीय सख्य आहे. त्यामुळे आता ‘चौकीदार’, ‘साहेबां’ना सोडा अन् प्रकाश आंबेडकरांना साथ द्या, अशी हाक ओवैसी यांनी मतदारांना दिली.
मोदींमुळे राज्यघटना असुरक्षित
पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने केंद्रात सत्ता स्थापन केली. आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा निवडणुकीत मोदी यांनी हिंदू-मुस्लिम वाद प्रचारात आणल्याने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही धोक्यात आली असून, राज्यघटना असुरक्षित आहे, असे ओवैसी म्हणाले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मार्गदर्शन केले.
उद्धव ठाकरे ‘भिगी बिल्ली’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध रान पेटविले. ‘चौकीदार चोर है’ म्हणत मोदींना लक्ष्य केले. मात्र, लोकसभा निवडणूक लागताच आता ‘चौकीदार जिंदाबाद’चे नारे लावले जात आहे. असे काय घडले, मोदी, शहांच्या डरकाळीने ठाकरे हे १०० मीटरच्या गतीने धावत गेले आणि भाजपसोबत युती केली, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला.