पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लॉक’ का? सामान्य प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:20+5:302021-08-19T04:17:20+5:30

विशेष गाड्यांच्या प्रवास भाड्यांनी कंबरडे मोडले, भुसावळ- नागपूर, अमरावती- नागपूर सवारी गाडी सुरू करण्याची मागणी अमरावती : कोरोनाच्या ...

Why are passenger trains still 'locked'? The question of ordinary passengers | पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लॉक’ का? सामान्य प्रवाशांचा सवाल

पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लॉक’ का? सामान्य प्रवाशांचा सवाल

Next

विशेष गाड्यांच्या प्रवास भाड्यांनी कंबरडे मोडले, भुसावळ- नागपूर, अमरावती- नागपूर सवारी गाडी सुरू करण्याची मागणी

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल होऊन अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे बंद का, याबाबत प्रवाशांकडून विचारणा केली जात असून, त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १० महिने रेल्वे वाहतूक ठप्प आहे. आता शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही मोजक्याच विशेष रेल्वे सुरू आहेत. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरी पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

बॉक्स

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच

१) बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावरून नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होत्या. अमरावती- नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, नागपूर- जबलपूर, नागपूर-अमरावती, भुसावळ पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होत्या. मात्र, कोरोनामुळे या सर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-------------

सुरू असलेल्या विशेष रेल्वे

१) सध्या अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरून २४ रेल्वेगाड्या धावतात. दरदिवशी धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गाेंदिया विदर्भ एक्सप्रेस, अहमदाबाद -चेन्नई नवजीवन, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया महाराष्ट्र स्पेशल, अहमदाबाद - हावडा, पुणे- हावडा विशेष, मुंबई - नागपूर, अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-तिरूपती, अमरावती-पुणे विशेष यांचा समावेश आहे.

------------------

रेल्वेचा प्रवास परवडेना!

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटीने ये-जा करावे आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे.

- मुंकूद जोशी, रेल्वे प्रवासी

-----------------

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही आगाऊ पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांनादेखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा मिळावा.

- प्रवीण कस्तुरे, रेल्वे प्रवासी

Web Title: Why are passenger trains still 'locked'? The question of ordinary passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.