'लक्ष्मी' पावलाने आलेली ती 'नकोशी' कधी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:23 AM2024-10-15T11:23:26+5:302024-10-15T11:25:56+5:30

Amravati : तिसरी, चौथी मुलगी झाल्यास उचलले जाते टोकाचे पाऊल

Why did people kill a newborn girl ? | 'लक्ष्मी' पावलाने आलेली ती 'नकोशी' कधी झाली?

Why did people kill a newborn girl ?

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
नकोसे असलेले मूल फेकून देण्याचे पाप काही मातांकडून केले जाते. असे केल्यास न्यायालय जन्मदात्यांना कठोर शिक्षा देते. अलीकडे अनैतिक संबंधातून जन्मास आलेले शिशु फेकून देण्याचे प्रकार घडून येतात. काळजाचा तुकडा फेकल्यास १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाद्वारे सुनावली जाते. तर काही प्रकरणांत तिसरी व चौथी मुलगीच झाल्यास अवसानघातकी निर्णय घेतला जातो.


प्रेम प्रकरणातून लग्न न होताच बाळ जन्माला आल्यास अशा बाळाला कुठेतरी फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो. जन्माला घातलेले बाळ फेकताना मातेलाही अश्रू अनावर झालेले असतात. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास संबंधित व्यक्ती तयार होत नाही. त्यावेळी माता निर्दयी बनते; मात्र, हे चुकीचे आहे. संबंधित मातेवर कारवाई होते. बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास त्याचा जन्मदाता बाप तयार नसल्यास याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात करता येते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा असा कुठलाही प्रकार उघड झाला नाही. तर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक मृत अर्भक आढळले होते. 


नऊ महिन्यांत एक गुन्हा दाखल 
गेल्या नऊ महिन्यांत शहर आयुक्तालयात नवजात अर्भक फेकून दिल्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहर वा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील तसे प्रकार उघड झालेले नाहीत.


किती 'नकोशी'च्या माता-पित्यांना पकडले? 
ज्या व्यक्तीपासून गर्भधारणा झाली ती व्यक्ती मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास किंवा लग्न करण्यास तयार नसेल तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी, पोलिस यंत्रणा, महिला समुपदेशन केंद्र संबंधित कुमारी मातेला न्याय मिळवून देत असते. मृत अर्भक फेकल्यास ३ वर्षांची शिक्षा; अर्भक जिवंत सापडले असल्यास प्रथम त्याला दवाखान्यात दाखल केले जाते.


काळजाचा तुकडा फेकावा कसा वाटतो? 
इर्विनमधील कॅज्युअलटी विभागातील शौचालयाच्या सीटमध्ये यंदाच्या २६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास एक नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून ते अर्भक शवविच्छेदनासाठी पाठविले होते. शौचालयाच्या सीटमध्ये एक मृत पुरुष लिंगाचे अर्भक आढळले. उपचारासाठी आलेले रुग्ण जेव्हा शौचालयामध्ये गेले तेव्हा ही घटना उघड झाली, अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ असावे, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी मृत अर्भकाच्या मातेचा शोध चालविला होता.


"फेकलेल्या मृत वा जीवंत नवजात अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांमार्फत केले जाते. मृत अर्भक कुठेही फेकून दिल्यास संबंधित मातेला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा न्यायालय ठोठावू शकते. अर्भक फेकून देणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. २६ ऑगस्ट रोजी इर्विन रुग्णालयात मृत अर्भक आढळले होते."
- मनोहर कोटनाके, ठाणेदार, कोतवाली

Web Title: Why did people kill a newborn girl ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.