आदिवासी विद्यार्थी पायीच का निघाले अमरावतीहून धारणीकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:45 PM2024-12-04T14:45:12+5:302024-12-04T14:45:35+5:30
वसतिगृहात प्रवेशाचा तिढा सुटला नाही : अमरावतीच्या अपर आयुक्त कार्यालयावरही दिली धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :अमरावती शहरात शिक्षण घेत असलेल्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी धारणीस्थित एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे पायी कूच केले आहे. बुधवारी ते धारणीत दाखल होतील, असा अंदाज आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयात धडक देत समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र, येथे तोडगा निघाला नसल्याचे हे विद्यार्थी धारणीकडे निघाले, हे विशेष.
धारणीच्या दिशेने निघालेल्या पायी वारीत युवकांसह युवतींचाही समावेश आहे. अमरावती येथील शासकीय वसतिगृहात प्रवेशाचा मुद्दा गंभीर स्वरूपाचा असल्याचे तक्रारीत नमूद आहे. वसतिगृहाचे अधीक्षक हजर राहत नाहीत. विद्यार्थ्यांची कामे वेळेवर होत नसून कर्मचारी त्रास देत असल्याची ओरड आहे. डीबीटीसह संगणक, टेबल खुर्ची मिळावे, स्पर्धा परीक्षा पुस्तके, ड्रेस कोड असावा, वाचनालय सुरू करणे, आदिवासी मुलांचे शासकीय इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करणे, वसतिगृहात रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात, वसतिगृहात नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने अबरार सोलकर, शंकर इवनाथे, रवी गव्हाळे, सौरभ सुरतने आदी विद्यार्थी पायीच धारणीकडे निघाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक आदिवासी, तसेच गैरआदिवासी नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
"मंगळवारी विद्यार्थी वसतिगृहाच्या 'स्पॉट अॅडमिशन'साठी आले होते. मात्र, त्यांना एक दिवस थांबा असे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी धारणीची चमू बोलावून त्यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला. मात्र, हे विद्यार्थी आताच तोडगा काढा यावर अडून होते. कारण प्रवेशाचा विषय हा धारणी प्रकल्प अधिकारी अधिनस्थ आहे. एक दिवस थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण त्यांनी ऐकले नाही."
- जितेंद्र चौधरी, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती