दीपाली चव्हाण यांनाच का त्रास दिला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:05+5:302021-04-13T04:13:05+5:30
अमरावती : मेळघाटातील इतरांना सोडून हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनाच का त्रास देण्यात आला? शासनाकडून अनुदान प्राप्त ...
अमरावती : मेळघाटातील इतरांना सोडून हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनाच का त्रास देण्यात आला? शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असताना, मुद्दाम कामांचा निधी न देणे, आर्थिक नाकेबंदी करणे, ॲट्राॅसिटीचे बनावट गुन्हे हे सर्व ती वनविभागात चांगले काम करत होती म्हणून काय, असा सवाल दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांनी रविवारी वनविभागामार्फत गठित तपासणी समितीच्या पुढ्यात ठेवला.
प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी वनविभागांतर्गत नऊ सदस्यीय समितीचे गठण केले आहे. या समितीच्या तीन उपसमित्या गठित झाल्या आहेत. ही समिती ११ व १२ एप्रिल रोजी दौऱ्यावर आली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) एम.के. राव, नागपूर येथील वन विकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मिरा अय्यर त्रिवेदी, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या उपसमितीने दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांना बोलावले आणि माहिती जाणून घेतली. यावेळी राजेश यांनी समितीच्या पुढ्यात भावना व्यक्त केल्या. दीपाली यांनी सुसाईड नाेटमध्ये ज्या बाबीचा उल्लेख केल्या, त्याच आधारावर चौकशी केल्यास वनविभागात परराज्यातील अधिकाऱ्यांना कसा माज आला, हे स्पष्ट होईल. २५ मार्च रोजी दीपाली यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या दोन दिवसांपूर्वी नेमके काय झाले, याबाबत सांगताना राजेश माेहिते यांनी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या कारनाम्याची मालिका समितीपुढे मांडली. हरिसाल येथील वनपरिक्षेत्रात झालेल्या कामांसाठी आलेले अनुदान न देणे, अडवणूक करणे, मजुरांचे वेतन रोखणे असे एक ना अनेक किस्से त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. दीपाली यांना मानसिक त्रास देणे ही नित्याचीच बाब होती. मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना प्रसूती रजेसाठी कसा त्रास दिला जातो एवढ्या मुद्द्यावर चौकशी करा, यातील खरे वास्तव पुढे येईल, असे मोहिते समितीला म्हणाले. काही जण नोकरीवर रुजू झाल्यापासून मेळघाटातच आहेत. त्यांना बदली कायदा लागू नाही का? ज्यांना राजकीय पाठबळ आहे अथवा वशिलेबाजी असल्यास त्यांना एक अथवा दोन वर्षातच मेळघाटातून बदली होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-----------------
दीपालीबद्दल पुनर्वसित गावकऱ्यांना विचारा
दीपाली चव्हाण यांनी मांगिया, वाघोली या गावांचे पुनर्वसन केले. येथील गावकऱ्यांना नव्याने शेती घेण्यासाठी मदत केली. पुनर्वसित गावांनीही आता शहराचे रूपडे घेतले आहे. गावकरी सांगतील, त्यांनी कसे काम केले आहे? चांगले काम करूनही दीपाली यांना जीव द्यावा लागला. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक़ एम.एस. रेड्डी यांना आपण स्वत: भेटलो आणि विनोद शिवकुमारची अरेरावी सांगितली. मात्र, रेड्डी याने काहीच लक्ष दिले नाही, असे मोहिते यांनी समितीला सांगितले.