का अडकता सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:36+5:302021-07-31T04:12:36+5:30
पान ३ चे लीड अमरावती : शहर तथा जिल्ह्यात सायबर क्राईम कमालीचा फोफावला आहे. पोलिसांकडून वारंवार ‘जागर’ सुरू असतानादेखील ...
पान ३ चे लीड
अमरावती : शहर तथा जिल्ह्यात सायबर क्राईम कमालीचा फोफावला आहे. पोलिसांकडून वारंवार ‘जागर’ सुरू असतानादेखील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. रोज अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत; मात्र हा फसवणुकीचा गोरखधंदा थांबलेला नाही. त्या अनुषंगाने शहर आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी अमरावतीकरांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर गुन्हेगार हे आपल्याला फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डबाबत माहिती, ओटीपी विचारुन फसवणूक करतात. त्यामुळे कोणालाही आपल्या बँक खात्याची, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका. आलेला ओटीपी सांगू नका. काही सायबर गुन्हेगार हे मोबाईलमध्ये ऐनी डेक्स, टीम विव्हर, क्विक सपोर्ट, ॲन्ड्राॅईड अप्लिकेशन डाऊनलोड करावयास सांगून त्यातून तुमच्या मोबाईलचा ताबा मिळवितात व परस्पर बँक व्यवहार करून आपली फसवणूक करतात. त्यामुळे मोबाईलवर कोणाचे सांगण्यावरून ॲप इन्स्टाॅल करू नका. फोन पे, पेटीएम, गुगल पेवर केवायसी तसेच कॅशबॅकच्या नावावर फसवणुकीचे प्रकार घडत असून, अनोळखी इसमांकडून काॅल करून केवायसी किंवा कॅशबॅकची बतावणी करून नोटिफिकेशनमध्ये जाऊन पे करण्यास सांगितले जाते व फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा अनोळखी मोबाइल काॅल्सपासून सावध राहावे. काही सायबर गुन्हेगारांकडून आपल्याला लाॅटरी लागलेली आहे, कार जिंकली आहे, केबीसीमध्ये क्रमांक लागला आहे, असे सांगून विविध प्रोसेसच्या नावाखाली पैशांची मागणी करून फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा फोन काॅल्स मॅसेजवर विश्वास ठेवू नये. याबाबत काही एक तक्रार असल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाण्याला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणुकीचे नवनवे प्रकार
सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडिया हॅन्डलिंग, गुगल सर्च फ्राॅड, ओएलएक्स फ्राॅड, रिमोट कंट्रोल ॲप्स, क्यूआर कोड फ्राॅड, यूपीआय फ्राॅड असे नवनवीन प्रकार समोर आले आहेत. त्यापासून कमालीची सजगता बाळगणे गरजेचे आहे.
बतावणीला बळी पडू नका
सायबर गुन्हेगार हे ओएलएक्सवर आर्मी, सीआयएसएफ, एसआरपीएफ अशा सुरक्षा दलातील कर्मचारी असल्याची बतावणी करून मोबाईल, मोटरसायकल, कार, फर्निचर अशा वस्तूंची खरेदी/विक्री करण्याच्या नावावर फसवणूक करीत आहे. तरी प्रत्यक्ष वस्तू पाहिल्याशिवाय किंवा व्यक्तीला भेटल्याशिवाय ऑनलाइन व्यवहार करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.