मेल, फिमेलची पाकिटे कशासाठी? मास्टरमाईंड कोण?; बोगस कपाशी बियाण्यांच्या प्रॉडक्शनचा डाव
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 19, 2023 06:40 PM2023-06-19T18:40:11+5:302023-06-19T18:40:19+5:30
प्रतिबंधित एचटीबीटीच्या जप्त केलेल्या ४४२ पाकिटांमध्ये मेल व फिमेल बियाण्यांची स्वतंत्र पाकिटे आढळल्याचे एसएओ यांनी सांगितले.
अमरावती : प्रतिबंधित एचटीबीटीच्या जप्त केलेल्या ४४२ पाकिटांमध्ये मेल व फिमेल बियाण्यांची स्वतंत्र पाकिटे आढळल्याचे एसएओ यांनी सांगितले. त्यामूळे येथेच बोगस बियाण्यांचे प्रॉडक्शन करण्याचा डाव उधळला गेला आहे. या बोगस बियाण्यांमागे खरा सूत्रधार कोण?, याशिवाय पोलिस तपासात आणखी कोणती माहिती बाहेर समोर येते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कृषी विभागाद्वारा आतापर्यंत जे छापे टाकले, त्यामध्ये अशाप्रकारे मेल व फिमेल बियाण्यांची स्वतंत्र पाकिटे कधीही मिळाली नाहीत.
त्यामुळे या बियाण्यांच्या पेरणीपश्चात संकराने तयार होणारा कापूस येथेच खरेदी करायचा व त्या कापसाची गलई करायची व त्याद्वारे बियाण्यांचे उत्पादन करायचे, असा आरोपीचा डाव असल्याची शक्यता असल्याचे एसएओ सातपुते यांनी सांगितले. कृषी व पोलिस विभागाद्वारे शनिवारी उशिरा केलेल्या कारवाईत प्रतिबंधित कपाशीच्या बोगस बियाण्यांची ४४२ पाकिटे जप्त करण्यात आली होती व एका कृषी विषयक कंपनीचा विक्री प्रतिनिधी असलेल्या अशोक भाटे याला अटक करण्यात आलेली आहे.