मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही?
By गणेश वासनिक | Published: July 23, 2023 07:11 PM2023-07-23T19:11:15+5:302023-07-23T19:11:41+5:30
शंकरबाबा पापळकर यांची खंत, संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटन
अमरावती : राज्यात अनेक प्रसिद्ध तथा नामवंत मराठी साहित्यीक असून त्यांचे साहित्य देखील दर्जेदार आहे. मात्र, एकाही मराठी साहित्याला नोबल अथवा ऑस्कर पुरस्कार मिळू शकले नाही, ही खेदाची बाब असल्याची भावना अनाथाचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत अमरावती विभाग द्वारा आयोजित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या के. जी. देशमुख सभागृहात संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटक म्हणून त्यांनी विचार मांडले. साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. अरविंद देशमुख तर स्वागताध्यक्ष डॉ. गजानन हेरोळे हे होते. विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, नंदकिशोर पाटील, मिलिंद रंगारी, शिवा प्रधान, गांधारी पापळकर, अविनाश राजगुरे, पद्माकर मंडवधरे आदी उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना शंकरबाबा पापळकर म्हणाले, संत गाडगे बाबा यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले, मी स्वत:ला भाग्यशाली मानतो. मात्र, जो माणूस कधी शाळेत गेला नाही. शिक्षणाचा गंध नाही. पण त्या माणसाच्या नावाला विद्यापीठाचे नाव दिले जाते, ही बाब ईतिहासात नोंद करणारी आहे. आणि त्याच अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झाले, हा दुर्मिळ योग आहे. परंतु, आता या साहित्य संमेलनातून साहित्यीकांनी प्रतिज्ञा करावी की, येत्या काळात मराठी साहित्य हे सातासमुद्रपार गेले पाहिजे. विदेशात दर्जेदार मराठी साहित्याची दखल व्हावी आणि नोबल, ऑस्कर पुरस्कार मिळावे, अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनाचे संचालन दीक्षा भावे यांनी केले.
प्रारंभी ग्रंथदिडी, संमेलनाचे उ्दघाटन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, प्रबोधनकारी कवी संमेलन आणि समारोपीय सत्राने संमेलनाचे सूप वाजले.