‘मनभरी’विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?
By admin | Published: September 30, 2016 12:23 AM2016-09-30T00:23:26+5:302016-09-30T00:23:26+5:30
चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
सब चलता है... : अमरावतीत एफडीएची गरज तरी काय ?
अमरावती : चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अन्न, औषधी प्रशासनाला तशी फौजदारी तक्रार नोंदविण्याचे अधिकार आहेत. परंतु संबंधित विभागाने ते का टाळले, हे गूढ आहे.
एखाद्या खाद्यपदार्थात पाल किंवा कुठलाही हानीकारक पदार्थ आढळल्यास फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. मानवी शरीराला अपाय पोहोचविणारा कुठलाही पदार्थ खाद्यान्नात आढळल्यास, तो खाल्ल्यामुळे उलट्या झाल्यास तो शरीराला अपायकारक आहे, असे संकेत मिळतात. अन्न औषधी प्रशासन विभागाने या मुद्याची तातडीने दखल घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त करवून घेणे महत्त्वाचे ठरते. संबंधित ग्राहकही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांनी घेतलेली 'ट्रीटमेंट' अधिकृत पुरावा ठरते. मुळात ज्या ग्राहकाने बाधित अन्नाचे सेवन केले त्या ग्राहकाला झालेला आरोग्याविषयीचा त्रास हादेखील पुरावाच ठरतो. त्याने तक्रार केली असल्यास त्यानुसार प्रक्रिया करून वा तक्रार केली नसल्यास संबंधित ग्राहकाचे बयाण नोंदवून अन्न औषधी प्रशासनाने फौजदारी प्रक्रियेची तयारी आरंभायला हवी.
मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळलेली पाल शरीराला घातक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पालीच्या सेवनाने विषबाधा होऊ शकते. पालीने सेवन केलेले कीटक मानवी शरीराला घातक असणाऱ्या श्रेणीतील असतील तर त्यामुळेदखील शारीरिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. पाल ज्या भागात फिरते, त्या भागात असलेले जिवाणू मानवी शरीरात आजार निर्माण करणारे असू शकतात. तसे जिवाणू पूर्ण खाद्यान्नात वाढीस लागले आणि ते अन्न सेवन केले गेले तर मानवी आरोग्याला अपाय निर्माण होऊ शकतो.
या सर्वच शक्यता मनभरी चिवड्यात आढळलेल्या पालिच्या अनुषंगाने निर्माण झाल्या आहेत. तरीही बळ मनभरीच्याच पारड्यात आहे. (प्रतिनिधी)