स्कूलबसचे फिटनेस चालकांचे का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:14 PM2018-09-03T22:14:45+5:302018-09-03T22:15:47+5:30
शहरात चिमुकल्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अनुचित घटना टाळण्यासाठी व्हॅनचे फिटनेस आरटीओंकडून नित्याने तपासले जाते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या चालकांचे का नाही, असा सवाल नागरिकांचा असून, एका खासगी डॉक्टरांकडे दोन स्कूल व्हॅनचालक तपासणीकरिता आले असता, ही बाब उघडकीस आली. यासंदर्भात त्यांनी आरटीओंना पत्राद्वारे कळविले आहे.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात चिमुकल्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅन मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अनुचित घटना टाळण्यासाठी व्हॅनचे फिटनेस आरटीओंकडून नित्याने तपासले जाते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या चालकांचे का नाही, असा सवाल नागरिकांचा असून, एका खासगी डॉक्टरांकडे दोन स्कूल व्हॅनचालक तपासणीकरिता आले असता, ही बाब उघडकीस आली. यासंदर्भात त्यांनी आरटीओंना पत्राद्वारे कळविले आहे.
अनेक चालकांना विविध प्रकारचे आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना याची कल्पना असतानाही व्हॅन चालविण्याचे धाडस ते करतात. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. हृदय व मधुमेहतज्ज्ञ मनोज निचत यांच्याकडे दोन चालक तपासणीसाठी आल्यानंतर चालकाचे आरोग्य फिटनेस नसल्याचे त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांना पत्राद्वारे निदर्शनात आणून दिले.
राजापेठ येथील डॉ. मनोज निचत यांच्याकडे गत आठवड्यात दोन रूग्ण दाखल झाले होते. विचारणा अंती ते स्कूलबसचे चालक असल्याचे निष्पन्न झाले. आजारपणातही त्यांनी स्कूल व्हॅन चालवित आणले, हे विशेष. त्यापैकी एक चालकाचे हिमोग्लोबिन ७ ग्रॅमपेक्षा कमी असल्याचे तपासणीत आढळून आले व त्याला चालताना दम लागायचा, तसेच त्याला अंधारी येत असल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली. दुसºया चालकाचे रक्तदाब २००/१०० असे होते. त्यांचे डोके दुखत होते. त्यांना चक्कर येत होती. हीच बाब हेरून असे चालक स्कूल व्हॅन चालविण्यास सक्षम नसू शकतात, असे डॉ. निचत यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.
तज्ज्ञांकडून चालकाची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करून तसे फिटनेस प्रमाणपत्र मिळवावे, असेसुद्धा पत्रात नमूद केले आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकाकडून प्रमाणित केलेले आरोग्य तपासणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे, अशी तरतूद आरटीओने करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात ६५० स्कूल व्हॅन, स्कूल बसेस
आरटीओकडे नोंदणीकृत शहरात ६५० स्कूल व्हॅन व स्कूल बसेस आहेत. शाळा सुरू होण्यापुर्वीच स्कूल व्हॅनचे फिटनेस तपासावे लागतात. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते. परंतु वाहनचालकाचे फिटनेस करण्यात येत नाही. त्यामुळे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
पाच लाखांवर विद्यार्थी घेतात शिक्षण
माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये १ ते १२ पर्यंत ५ लाख २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे शिक्षणाधिकारी सांगतात. यामध्ये बहुतांश विद्यार्थी स्कूल व्हॅनने प्रवास करतात. त्यामुळे व्हॅनचालकांचे आरोग्य उत्तम राहायला हवे. शाळांनी व आरटीओने चालकाला आरोग्य फिटनेस प्रमाणपत्राशिवाय परवानगी देऊ नये, अशी मागणी आहे.
त्या दोन स्कूल व्हॅनचालकांची प्रकृती अतिशय खराब होती. एकाचे हिमोग्लोबीन फारच कमी होते. दुसºयाचा रक्तदाब वाढला होता. अशांनी वाहन चालवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकू नये.
- डॉ. मनोज निचत,
श्रीकृष्ण हॉस्पिटल, अमरावती
नागरिकांनी अशा चालकांची माहिती दिल्यास शाळा प्रशासनाशी संपर्क साधला जाईल. अशा वाहनचालकांचा परवाना रोखू, वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या आरोग्य तपासणीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करू.
- रामभाऊ गिते, आरटीओ