हिंदी भाषकांची अनेक राज्ये, मराठी माणसांची का नाहीत?
By admin | Published: November 19, 2014 10:31 PM2014-11-19T22:31:54+5:302014-11-19T22:31:54+5:30
देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या
अमरावती : देशात हिंदी भाषिकांचे अनेक राज्ये असताना मराठी माणसांची दोेन राज्ये का निर्माण होऊ शकत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी येथे उपस्थित करुन वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची चळवळ गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जनमंच लढा विदर्भाचा व विदर्भ माझा संघटनेच्यावतीने येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आॅडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी ‘वेगळ्या विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावर जाहीर व्याख्यानात ते प्रमुख व्यक्त म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड तर प्रमुख अतिथी म्हणून अतुल यादगिरे, अरुण वरणगावकर, बबन बेलसरे, अतुल गायगोले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना, श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत हेतुपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहे. ‘जय विदर्भ’ म्हटले तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा म्हणून संबोधले जाते, मात्र ‘जय महाराष्ट्र ’ म्हटले तर देशविरोधी होते काय, असा सवाल उपस्थितांच्या पुढ्यात ठेवला.
अणे यांनी विदर्भ राज्य निर्मितीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य, गोंड राजे, सीपी अॅन्ड बेरार, ब्रिटीशांचा कार्यकाळ, इंडियन नॅशनल कॉंग्रेस, अकोला करार, राज्य घटनेमध्ये विदर्भाविषयी तरतूद, अनुशेषाची टोलवाटोलवी, विदर्भ राज्य निर्मितीबाबत कमिशन नेमण्याचा फार्स, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची फसवेगिरी, असा इतिहास उलगडला. राज्यपालांना अनुशेष भरण्याचे विशेष अधिकार असताना राज्यकर्त्यांनी या अधिकाराला कशी बगल दिली, हे उदाहरणानिशी पटवून सांगितले. वेगळ्या विदर्भाशिवाय विकास नाही, त्यामुळे आता जय विदर्भाचा हुंकार पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.