आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही?

By गणेश वासनिक | Published: October 7, 2023 09:07 PM2023-10-07T21:07:19+5:302023-10-07T21:08:31+5:30

अब्दुल मन्नान अब्दुल गफूर यांचा सवाल; अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एसीबी महासंचालकांकडे तक्रार

why there is no crime against mla wajahat mirza for accepting bribe from acb | आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही?

आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही?

googlenewsNext

गणेश वासनिक, अमरावती : विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली. ही घटना २८ मार्च २०२३ रोजी नागपूर येथील रवी भवन कक्ष क्रमांक ४५ व २० येथे घडली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा देखील दाखल केला. मात्र, आमदार वजाहत मिर्झा यांंच्यावर सहा महिन्यांनंतरही एसीबीने गुन्हा दाखल केला नाही, अशी तक्रार सेवानिवृत्त तहसीलदार अब्दुल मन्नान अब्दुल गफूर यांनी केली आहे.

अमरावती येथील बेरार मुस्लीम एज्युकेशन कॉन्फरन्स व उस्मानिया मशीद ट्रस्टचे सदस्य अब्दुल मन्नान यांनी आमदार वजाहत मिर्झा यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या २९ मार्च २०२३ रोजीच्या एफआयआरनुसार सदर पोलिस ठाण्यात एसीबीच्या पोलिस निरीक्षकांनी आमदार मिर्झा यांना वगळून दिलीप खाेडे व शेखर भोयर या दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ०१४१/२०२३ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे नियम ७ अ व भादंवि संहिता १८६० चे कलम ३८४, ३८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, रवींद्र भुयार यांच्या तक्रारीनुसार आमदार वजाहत मिर्झा, दिलीप खाेडे व शेखर भोयर अशी तिघांची एक कोटींच्या लाचप्रकरणी साखळी असताना २५ लाखांची लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात मात्र आमदार मिर्झा यांना ‘तो मी नव्हेच’ अशी वागणूक एसीबीकडून दिली जात आहे. आता एसीबी चौकशी करीत आहे. कायदेतज्ञ्जाचे निरीक्षण नोंदविले जात आहे. आमदार मिर्झाच्या गुन्ह्यात सहभागाबाबतची लिंक पूर्ण होत नसल्याने हे प्रकरण न्यायालयात टिकणार नाही, असा जावईशोध म्हणजे आरोपींना अभय देण्याचा प्रकार असल्याचे तक्रारीतून अब्दुल मन्नान यांनी म्हटले आहे.

कशासाठी मागितली होती एक कोटींची लाच?

आरटीओ भुयार यांच्या विरोधातील महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा मुद्दा विधान परिषदेत आमदार वजाहत मिर्झा यांनी उचलू नये, त्याविषयी सभागृहात चर्चा होऊ नये, हा विषय बाहेरच मिटविण्यासाठी दिलीप खोडे, आमदार वजाहत मिर्झा, शेखर भोयर यांनी आरटीओ भुयार यांना एक कोटीची लाच मागितली होती. २५ लाखांची लाख स्वीकारताना पकडले गेले.

Web Title: why there is no crime against mla wajahat mirza for accepting bribe from acb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.